coronavirus | कोरोनाच्या भीतीने विठुरायाच्या रंगपंचमीचा बेरंग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर समितीने रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर : वसंतोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी. वसंत पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत रोज विठुरायाला पांढऱ्या पोशाखावर विविध प्रकारचे नैसर्गिक रंग टाकून त्या रंगात या रंगविले जाते. रंगपंचमी हा मुख्य दिवस असतो. सायंकाळी देवाची पूजा करून पोशाखाच्या वेळेला रंगात रंगलेला विठुराया रंगाचा डफ घेऊन गावात अवघ्या विश्वाला रंगविण्यासाठी बाहेर पडतो अशी वारकरी संप्रदायाची मान्यता असल्याने सायंकाळी देवाच्या रंगाचा डफ प्रदक्षिणा मार्गावरून फिरविण्यात येतो . हा रंग आपल्या अंगावर पडावा यासाठी शेकडो भाविक या डफात सामील होतात. यंदा मात्र कोरोनाने खुद्द देवाच्या रंगपंचमीचा बेरंग केला असून यंदा पारंपरिक रंगपंचमी साजरी न करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला आहे. या सणानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे दरवर्षी रंगांची उधळण करीत रंगांच्या डफाची सवाद्य मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.
रंगपंचमीच्या या मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रंगांची मुक्तपणे उधळण करीत भाविक रंग खेळत असतात. दुपारी निघणारी रंगांच्या डफाची मिरवणूक हे गेल्या शेकडो वर्षांपासून भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असते. या मिरवणुकीत खुद्द विठुराया भक्तांशी रंग खेळण्यासाठी मंदिराबाहेर येतो या श्रद्धेतून विठ्ठलभक्त या रंगांच्या मिरवणुकीत सामील होत देवाचा रंग आपल्या अंगावर पडावा यासाठी धडपडत असतात. या मिरवणुकीत पाण्याचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.
coronavirus | कोरोनाचा फटका विठूरायाच्या रंगपंचमीला, रंगांची उधळण न करता रंगपंचमी
यंदा कोरोनाच्या दहशतीचा फटका थेट देवाच्या रंगपंचमीलाही बसणार असून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाच्या मिरवणुकीत रंगांची उधळण न करता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून केवळ परंपरेचे जतन केले जाणार असल्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. शास्त्रानुसार विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर केवळ नैसर्गिक रंगाची उधळण करून साधेपणाने रंगपंचमी साजरी होणार आहे. मंदिर किंवा बाहेर रंगांची मुक्त उधळण करीत रंगपंचमी होणार नाही. मंदिर समितीने भाविकांनाही मंदिर अथवा परिसरात रंग न खेळण्याची विनंती केली आहे.
संबंधित बातम्या :
नागरिकांनी घाबरू नये, पण काळजी घ्या : आरोग्यमंत्री राजेश टोपे
#Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यातील काही CBSE, ICSC शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय