एक्स्प्लोर
छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोरोनासंदर्भातील 'त्या' आदेशाला केराची टोपली, तर कर्नाटकात मुख्यमंत्र्यांनीच नियम मोडला
ज्या लोकांनी नियम बनवले त्या नेत्यांकडूनच कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीत नियम तोडले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्रात छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील तर कर्नाटकात मुख्यमंत्र्यांनीच नियमांना केराची टोपली दाखवली आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, नियमावली बनवली जात आहे. असं असताना मंत्री आणि मातब्बर नेत्यांकडूनच नियमांची पायमल्ली होत असताना दिसून येत आहे. राज्यात मंत्री छगन भुजबळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमांना हजेरी लावत गर्दीच्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी देखील नियम पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे.
छगन भुजबळांकडून शाळेचं उद्घाटन
महाराष्ट्रात सरकारने राज्यात गर्दी टाळण्याचे आवाहन करत अनेक ठिकाणी जमावबंदी घोषित केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राबरोबरच राज्य सरकारनं अनेक महत्वाची पाऊलं उचलली आहेत. राज्यातील शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे तसेच सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, याच आदेशाला पुण्यातील ससाणे एज्युकेशन सोसायटीने केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला हजेरी लावत राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आदेशाचं पालन न करता शाळेचं उद्घाटन केलं. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता. आता संबधित मंत्री आणि संस्था चालक यांच्यावर काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.यासंदर्भात छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन दोन वेळा ठरले होते. मात्र काही कारणास्तव प्रत्येक वेळी हा कार्यक्रम रद्द करावा लागला. आजचा कार्यक्रम देखील फार पूर्वीच नियोजन केले होते. त्यामुळे आज कार्यक्रमाला आलो आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचे भाषण करणार नसून, प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं भुजबळ म्हणाले.
चंद्रकांत पाटलांचा पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिलेत. पण हे आदेश भाजपकडून पायदळी तुडवले जातायेत. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित बैठक घेतली गेली. या बैठकीला शंभरच्या आसपास पदाधिकारी जमले होते.
येडीयुरप्पा लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी रविवारी बेळगावात विधान परिषदेचे भाजपचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांच्या कन्येच्या विवाहाला उपस्थिती दर्शवून आपणच जाहीर केलेल्या आदेशाचा भंग केला आहे. शंभरहून अधिक व्यक्ती विवाह आणि अन्य समारंभाला उपस्थित राहू नये असा आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बजावला आहे. मात्र शगुन गार्डन येथे झालेल्या विवाहाला येडीयुरप्पा यांनी उपस्थित राहून आदेश भंग केला आहे. या विवाहाला हजारहून अधिक व्यक्ती उपस्थित होत्या. मुख्यमंत्रीच नियमाचा भंग करत असतील तर सर्वसामान्य जनतेने नियम पाळावे अशी अपेक्षा कशी करणार अशी चर्चा होत आहे. विमानतळावर त्यांना 'मोठ्या संख्येने लोक येणाऱ्या विवाहाला तुम्ही उपस्थित राहणार हा नियमभंग नाही का?' असे पत्रकारांनी विचारले असता उत्तर देणे टाळून तेथून ते निघून गेले.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 36 वर
- पुणे - 16
- मुंबई - 5
- ठाणे - 1
- कल्याण- 1
- नवी मुंबई - 1
- पनवेल - 1
- नागपूर - 4
- अहमदनगर - 1
- यवतमाळ -2
- औरंगाबाद - 1
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर
- महाराष्ट्र -33
- केरळ - 22
- पंजाब - 1
- दिल्ली - 7
- जम्मू कश्मीर - 2
- लडाख - 3
- राजस्थान - 4
- उत्तरप्रदेश - 11
- कर्नाटक - 6
- तामिळनाडू - 1
- तेलंगाना - 3
- हरयाणा - 14
- आंध्रप्रदेश - 1
VIDEO | पुणे विभागीय आयुक्तांची आणि जिल्हाधिकारी यांची पत्रकार परिषद
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement