कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर देण्याचे कृषि विभागाचे नियोजन
कृषी विभागाच्या समन्वयाने कृषी साहित्यांचा पुरवठा कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही आणि त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणे शक्य होईल, असं कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितलं.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून कार्यवाही करताना कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर समन्वयक म्हणून काम पाहा. कालबद्ध कार्यक्रम तालुकास्तरावर तयार करून 31 मे पूर्वी या कृषी साहित्याचा पुरवठा शेतकऱ्यांना होईल, असं नियोजन करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले. राज्यातील खरीप हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये असलेल्या संचारबंदीत शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाच्या समन्वयाने कृषी साहित्यांचा पुरवठा कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही आणि त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणे शक्य होईल, असं कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितलं.
गाव पातळीवर कृषी निविष्ठा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील गटांकडे नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी त्यांच्या नावासह संपूर्ण तपशील (पत्ता, गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ज्या कृषी सेवा केंद्रामधून निविष्ठा खरेदी कराययी त्याचे नाव आणि आवश्यक निविष्ठा) यांची मागणी गटाकडे नोंदवायची आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील. सोबतच ते वाहतुकीकरता आवश्यक असणारे परवाने गटांकरीता उपलब्ध करून देतील.
शेतकरी गट प्रमुख नोंदणीनुसार बियाणे, खते, किटकनाशकांची खरेदी करतील. खरेदीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी कृषि अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये समन्वय घडवून आणतील. शेतकऱ्यांना वाजवी असणाऱ्या दरातच खरेदी करावी, अशा सूचना कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी कृषी सह संचालक, जिल्हा कृषी अधिक्षक यांना दिल्या आहेत.
संबंधित बातम्या
- PM Modi | 3 मे चा दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर काय? पंतप्रधानांकडून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना
- PM Modi | कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा : पंतप्रधान मोदी
- कोरोनाच्या रॅपिड टेस्ट किटमध्ये नफेखोरी, नफेखोरी करणाऱ्या कंपनीला कोर्टानं फटकारलं