'कोरोना इन्शुरन्स काढलेल्या तरुणांचे नंबर पाठव, त्याला पॉझिटिव्हचा रिपोर्ट देऊ'; अमरावतीमध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह अशी ऑफर अमरावती जिल्ह्यातील एका लॅबकडून दिली जात असल्याचं समोर आलं आहे. आज एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.

अमरावती : कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह अशी ऑफर अमरावती जिल्ह्यातील एका लॅबकडून दिली जात असल्याचं समोर आलं आहे. आज एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही क्लिप केव्हाची आणि कुठली हे जरी स्पष्ट नसलं तरी अमरावतीत चर्चेचा विषय ठरत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये लॅब डॉक्टर एका युवकाला सांगतोय की, "ज्यांनी पेटीएमचा कोरोना इन्शुरन्स काढला आहे अशा तरुणांचे नंबर पाठव, आपण त्याला पॉझिटिव्हचा रिपोर्ट देऊ आणि चार दिवस भर्ती करु आणि त्यांनतर त्याला क्लेम मिळवून देऊ."
काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी अमरावतीत एक रॅकेट सक्रिय असल्याचा गौप्यस्फोट केला होता, या ऑडिओ क्लिपमुळे त्याला दुजोरा मिळाला आहे. तसंच पुण्याच्या एका इन्शुरन्स कंपनीने अमरावती आणि अकोला येथे साडेतीन कोटी रुपये कोरोना इन्शुरन्स क्लेम मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रशांत साबळे यांचा दावा याविषयी बोलताना प्रशांत साबळे म्हणाले होते की, "कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे तपासण्यासाठी मी लॅबमध्ये गेलो. त्यावेळी एका डॉक्टरने तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह करायचा की निगेटिव्ह अशी विचारणा केली. त्यावेळी ही बाब माझ्या लक्षात आली नाही. त्यांनी हे शब्द कसे काय वापरले असं मला दोन दिवसांनी लक्षात आलं. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, पॉझिटिव्ह नसताना रिपोर्ट पॉझिटिव्ह देतात. चौदा दिवस क्वॉरन्टीन करतात, पगारी रजा घेतात, तीन हजार रुपये भरुन कोरोना विमा पॉलिसीमधून निम्मे पैसे वाटून घेतात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा मांडला."
दुसरीकडे भाजपने या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. चौकशी करुन कारवाई केली जाईल, असं आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
