'आरोग्य पंढरी झाली कोरोनानगरी', सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
सांगली जिल्हा हा राज्यभर आरोग्यपंढरी म्हणून ओळखला जातो. पण प्रशासनच्या चुकीच्या नियोजनामुळे आरोग्यपंढरीची मृत्यू पंढरी झाली आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात सोमवारी (31 ऑगस्ट) कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसभरात तब्बल 998 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे आता पर्यंतचे कोरोनारुग्ण संख्येचे सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. तर 30 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी तब्बल 223 रुग्ण हे सांगली महापालिका क्षेत्रातील आहेत, ज्यामध्ये 138 सांगली शहरातील तर 85 हे मिरज शहरातील आहेत.तर मिरज आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी 170 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सोमवारी दिवसभरात तब्बल 375 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.नव्या कोरोना रुग्णांच्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना संख्या ही 4 हजार 543 तर आज पर्यंतचा एकूण आकडा हा 12 हजार 394 झाला आहे, आता पर्यंत 7 हजार 356 जण कोरोना मुक्त,आणि आज अखेर 495 जणांचा मृत्यू झाला आहे,तसेच 661 जण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
मार्च महिन्यात मुंबई, पुणे पाठोपाठ कोरोना रुग्णाच्या संख्येत सांगली जिल्ह्याचा नंबर लागला होता. तो पण इस्लामपूर मध्ये एकाच ठिकाणी 27 हुन अधिक रुग्ण सापडले गेल्याने.मात्र नंतर या 27 रुग्णावर उपचार झाले आणि सर्वजण कोरोना रुग्ण मुक्त झाले. यामुळे सांगलीच्या कोरोना मुक्त पॅटर्नची बरीच चर्चा देखील झाली. पण जुलै -ऑगस्ट मध्ये पुन्हा जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने डोके वर काढले आणि जिल्हा पुन्हा कोरोनाच्या सावटाखाली गेला. अनेकवेळा लॉकडाऊन केला मात्र रुग्ण संख्या काही कमी होऊ शकली नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झालाय. आता तर दिवसाला 1 हजार इतके रुग्ण सापडू लागल्याने यंत्रणेची आणि जिल्हावासियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकीकडे पॉझिटीव्ह रुग्ण संख्या वाढत असताना मृत्यूदर ही राज्याच्या सरासरी पेक्षा पुढे गेला आहे. काही दिवसापूर्वी स्वतः आरोग्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त करत मृत्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. मात्र अजून पर्यंत तरी यंत्रणा मृत्यूदर आणि कोरोना रुग्ण संख्ख्या आटोक्यात आणू शकलेली नाही.
सांगली जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात कोरोनाचा आता उद्रेक झालाय. गेल्या चार दिवसात दोन हजार रुग्ण वाढले. तर मृतांची संख्याही वाढत आहे. सांगलीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 950 वर गेला आहे. 29 जुलैला सांगलीत मृतांची सख्या 70 इतकी होती. तीच संख्या 29 ऑगस्टला 465 इतकी झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यू दरही चार टक्के इतका आहे. तोही राज्यात नव्हे तर देशात जास्त आहे. जिल्ह्यात "कम्युनिटी स्प्रेडिंग सुरु झालं आहे. प्रशासनाने खासगी रुग्णालये अधिग्रहीत केलीत पण, तेथील कारभाराबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता कमी पडत आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यात जम्बो हॉस्पिटल उभारण्याची मागणी होऊ लागली आहे. शिवाय तालुका स्तरावर कोरोना रुग्णालये उभारावीत आणि कोरोनारुग्ण मुक्त होत असलेल्या रुग्णाचा प्लाझ्मा घ्यावा, यासाठी प्लाझ्मा केंद्र उभारावित अशी मागणी कोरोनावर मात केलेली लोकप्रतिनिधी करत आहेत.
तसे सांगली ही राज्यभर आरोग्यपंढरी म्हणून ओळखली जाते. पण प्रशासनच्या चुकीच्या नियोजनामुळे आरोग्यपंढरीची मृत्यू पंढरी झाली आहे. 10 हजाराच्यावर जिल्ह्यातील रुग्ण संख्या गेली असताना आणि रुग्ण संख्या वाढणार हे माहित असताना देखील अजून पर्यंत बेडची संख्या वाढवली नसल्याने एका सिरीयस रुग्णासाठी बेड ,ऑक्सीजन मिळवताना रुगणाची हेळसांड होत आहे. त्यामुळे युद्धपातळीवर सांगलीत हॉस्पिटल उभारण्याची मागणी नागरिक करत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थती हाताबाहेर गेल्याने व व्हेंटीलेटर बेड अभावी नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने एककल्ली कारभार बंद करून जिल्ह्यातील आय एम ए व जनरल प्रॅक्टिशनर फोरम च्या डाॅक्टरांना विनंती करून त्यांना विश्वासात घेवून त्यांना कोरोना नियंत्रणासाठी सहभागी करून घ्यावे अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
एकीकडे मुंबई मधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सांगली सारख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने आता जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्य पातळीवरील आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात राबवणे गरजचे बनले आहे.
संबंधित बातम्या :
- 'टोसिलीझुमॅब'चा काळाबाजार! 40 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 70 हजारांत विक्री केल्याचे उघडकीस
- अभिनेता सुबोध भावेला कोरोनाचं निदान, मुलगा, पत्नीही कोविड पॉझिटिव्ह