'टोसिलीझुमॅब'चा काळाबाजार! 40 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 70 हजारांत विक्री केल्याचे उघडकीस
पालघर बोईसर येथील टीमा रुग्णालयात 'टोसिलीझुमॅब' लसीचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालं आहे. तसेच 40 हजार रुपये किंमत असलेली ही लस काळ्या बाजारातून 70 हजार रोखीने विकली जात असल्याचे समोर आलं आहे.
पालघर : राज्यात तुटवडा असलेल्या करोना उपचारावरील 'टोसिलीझुमॅब' इंजेक्शनचा पालघरमध्ये काळाबाजार सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. मूळ किमतीपेक्षा जास्त दर आकारून या लसीची विक्री केली जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. 40 हजार रुपये किंमत असलेली ही लस काळ्या बाजारातून 70 हजार रोखीने विकली जात असल्याचे उघड होत आहे. ही लस बोईसर येथील टीमा रुग्णालयातील करोना उपचार केंद्रात कार्यरत असलेल्या एक खासगी फिजिशियन उपलब्ध करून देत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
टीमा रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या अत्यवस्थ रुग्णांना 'टोसिलीझुमॅब' आणण्यासाठी एका तज्ज्ञ डॉक्टरकडून तगादा लावला जात आहे. अनेकदा अत्यवस्थ रुग्णांना 'टोसिलीझुमॅब' लस लिहून देत आहेत. या लसीचा तुटवडा असल्याचे ठाऊक असूनही रुग्णांच्या नातेवाईकांकडे या लसीसाठी तगादा लावण्याचा प्रकार या डॉक्टरकडून गेले अनेक महिने सुरु आहे. नातेवाईकांनी ही लस मिळत नसल्याचे डॉक्टरांना सांगितल्यानंतर अधिक किमतीत ती उपलब्ध करून देण्याची तयारी या डॉक्टरकडून दाखविण्यात येते. त्यामुळे आधीच चिंतेत असलेल्या नातेवाईक पैसे गोळा करून ही लस खरेदी करीत असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. याबाबतच्या विविध तक्रारीही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर या इंजेक्शनचा वापर टाळण्याची सूचना खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टरला दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
रविवारी प्रशासनाने सेवा ताब्यात घेतलेल्या खासगी फिजिशियन डॉक्टरने टीमा रुग्णालयात दाखल असलेल्या एका अतिदक्ष रुग्णाला या डॉक्टरमार्फत 'टोसिलीझुमॅब' लस आवश्यक आहे, असे सांगण्यात आले. ही लस चक्क या डॉक्टरांनीच खासगीरीत्या फोन करून काळ्याबाजारातून उपलब्ध करून देत रुग्णांच्या नातेवाईकांना विकत घेण्याचा सल्ला दिला.
घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही डॉक्टरांनी सांगितल्यानुसार विश्वास ठेवत रुग्णांच्या मुलाने आणि नातेवाईकाने हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी तयारी दर्शवली. त्यानुसार या खासगी डॉक्टरने एका इसमाला फोन करत ती उपलब्ध करून देण्यास सांगितले. मात्र या इंजेक्शनची किंमत 70 हजार रुपये देऊन विनादेयक उपलब्ध होईल असेही सांगण्यात आले. त्यानंतर लस मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरू झाली. कसेबसे 70 हजार रुपये जमा करून या दोघांनीही डॉक्टरांनी सूचित केलेल्या त्या व्यक्तीला संपर्क केला.
त्यानुसार लस आणून देणाऱ्या समोरच्या व्यक्तीने या दोघांना ती घेण्यासाठी एका ठिकाणी बोलावले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला यात काही गडबड असल्याचा संशय आल्याने त्याने त्यांना ठरविलेली जागा बदलली. अखेर वरोर येथे कोणतेही देयक न देता 70 हजार रुपये नगदी घेऊन त्या इसमाने ही लस रुग्णांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली. शासकीय रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार देत असलेले असे डॉक्टर रुग्णांकडे महागडी औषधे आणण्यासाठी तगादा लावत असतील तर या यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास राहणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. 'टोसिलीझुमॅब'सारख्या महागडय़ा इंजेक्शन विक्रीच्या ठिकाणी उपलब्ध न होता त्यांचा थेट काळाबाजार सुरू असेल तर जिल्हा प्रशासन, अन्न व औषध प्रशासन यांच्यासह आरोग्य आणि पोलीस यंत्रणेने काळाबाजार करणाऱ्या टोळीचा छडा लावायला हवा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
इंजेक्शनसाठी तगादा
'टोसिलीझुमॅब' या इंजेक्शनला पर्यायी औषधे आणि लस प्रभावी नसल्याचे सांगण्यात आल्यानंतरही या लसीचा याच रुग्णालयात तगादा लावण्यामागचे कारण स्पष्ट होत नाही. या लसींचा तुटवडा असल्याने त्या सहसा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांचा काळाबाजार वाढतच आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
काळाबाजाराच्या माध्यमातून गोरगरिबांची थेट लूट सुरु आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरांसह ते बेकायदा उपलब्ध करून देणाऱ्या सर्वावर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी बोईसर येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल देसाई यांनी केली आहे. तर संबंधित डॉक्टर यांनी या इंजेक्शनसाठी तगादा लावला व त्यांनीच फोन करून उपलब्ध करवून दिली. लस देणाऱ्या समोरचा संपर्क क्रमांकही दिला. त्यानुसार संबंधित व्यक्ती न येता दुसऱ्या व्यक्तीने हे इंजेक्शन दिले. 40 हजारांचे इंजेक्शन कोणतेही देयक न देता 70 हजार रुपये रोखीने दिले असल्याची तक्रार एका रुग्णांच्या मुलने केली आहे.
'इंजेक्शनच्या काळा बाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या डॉक्टरची सेवा थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारींनुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. 'टोसिलोझुमॅब'चा तगादा लावू नये, अशा सूचना सर्व उपचार केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना या आधीही दिल्या आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी दिली आहे.