अभिनेता सुबोध भावेला कोरोनाचं निदान, मुलगा, पत्नीही कोविड पॉझिटिव्ह
प्रख्यात सिने-नाट्य-मालिका अभिनेता सुबोध भावेला कोरोनाचं निदान झालं आहे.सुबोध भावे सध्या गोरेगावातल्या आपल्या घरी असून ते सुखरूप आहेत.

मुंबई : एकीकडे लॉकडाऊन उठू लागला आहे. क्रमाक्रमाने अनलॉकिंग होऊ लागलं आहे. असं असतानाच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढताना दिसू लागला आहे. हा कोरोना आता मराठी कलाकारांच्या घरातही शिरला आहे. प्रख्यात सिने-नाट्य-मालिका अभिनेता सुबोध भावेला कोरोनाचं निदान झालं आहे.
सुबोध भावे सध्या गोरेगावातल्या आपल्या घरी असून ते सुखरूप आहेत. डॉक्टरही त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असून आवश्यक सर्व औषधोपचार तो घेतो आहे. त्यानेच सोशल मीडियाद्वारे ही माहीती दिली. सुबोधच्या आधी त्याच्या पत्नीला मंजिरीला कोरोनाचं निदान झालं. सुबोध आपल्या कुटुंबासह गणपतीसाठी पुण्यात गेला होता. तिथून आल्यानंतर त्याच्या पत्नीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यानंतर सुबोधही कोरोना पॉझिटिव्ह निघाला.
मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
— Subodh Bhave (@subodhbhave) August 31, 2020
सुबोधने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार तो त्याची पत्नी आणि मुलगा कान्हा यांना कोरोनाचं निदान झालं आहे. तिघांवरही कोरोनाचे उपचार सुरू असून आपण सुखरुप असून आपण सर्वांनी काळजी घ्या असा मेसेज त्याने दिला आहे. सुबोध भावेने कोरोना काळात सातत्याने रंगमंच कामगारांना, कलाकारांना आणि गरजू रंगकर्मींना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे. अनेक रंगमंच कामगारांना त्याने तात्पुरता रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. शिवाय, महाराष्ट्रात चित्रिकरण सुरू होण्यासाठीही पुढाकार घेणाऱ्या मोजक्या लोकांत सुबोध एक होता. सुबोधने आता काळजी घ्यावी आणि लवकर बरं व्हावं असं त्याच्या चाहत्यावर्गाने त्याला सोशल मीडियावरून सांगितलं आहे.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















