(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वीज गेल्याने अंधाराचा फायदा घेत कोरोनबाधित कैदी फरार, धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील घटना
आबा चंदू अहिरे याच्याविरुद्ध साक्री पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदीवान होता. कोरोनाची लागण झाल्याने 10 जूनला उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
धुळे : वादळी पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने अंधाराचा फायदा घेत कोविड कक्षातून कोरोनाबाधित कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या कैद्यावर उपचार सुरु होते. महत्त्वाची बाब म्हणजे हा कैदी खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत होता. तीन दिवसांपूर्वीच या कैद्याला धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं.
साक्री तालुक्यातील म्हसदी येथील 30 वर्षीय आबा चंदू अहिरे याच्याविरुद्ध साक्री पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदीवान होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याने 10 जूनला उपचारासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या कोविड कक्षात दाखल करण्यात आलं होतं, येथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी तीन पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती.
मात्र 12 जूनच्या रात्री सव्वा नऊच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. याचाच फायदा घेत बंदिवान आबा चंदू अहिरे रुग्णालयातून पसार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र काही उपयोग झाला नाही. शहर पोलीस स्टेशनला या घटनेप्रकरणी पसार झालेल्या बंदीवाना विरोधात गुन्हा दाखल झालाय. कोरोना बाधीत या बंदीवानामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत असल्यानं खळबळ माजली आहे. या रुग्णालयातून यापूर्वी देखील कोरोनाबाधित रुग्ण फरार होण्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत. मात्र ना रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेत बदल झाला, ना ही रुग्णालयाच्या यंत्रणेत बदल झाला.
या घटनेनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षा यंत्रणेचे, प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. या अगोदर देखील या रुग्णालयाच्या कोविड कक्षातून रुग्णांनी पलायन केल्याच्या घटना घडल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख धुळे दौऱ्यावर असताना या प्रश्नाकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधलं असता गृहमंत्र्यांनी संबधित यंत्रणेला सक्त आदेश दिल्यानंतर देखील पुन्हा कोविड कक्षातून रुग्ण फरार झाल्याची घटना घडल्यानं रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.