कोरोनामुळे विठुरायाचे उत्पन्नात दसपट घट, तब्बल 27 कोटी रुपयांचा फटका
कोरोना महामारीमुळे देशातील जवळपास सर्वच घटकांना फटका बसला आहे. यातून पंढरपूरमधील विठुरायाचे मंदिरही सुटले नाही.
पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत येत असताना याचा थेट फटका मंदिरांनाही बसला आहे. या वर्षात विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात दसपट घट होत 27 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. देशात कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर बंद करण्यात आले होते. यानंतर ते थेट दिवाळी पाडव्याला म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी उघडले. मात्र, अतिशय मोजक्या भाविकांना ऑनलाईन दर्शन व्यवस्थेनुसार दर्शन देण्यास सुरुवात झाली. काही दिवसापूर्वी ऑनलाईन सोबत थेट आलेल्या भाविकांनाही कोरोनाचे नियम पाळत दर्शनाला सोडण्याची व्यवस्था सुरु झाली आणि कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आल्याने भाविकांची संख्या कमालीची रोडावली आहे.
गेल्या वर्षी विठ्ठल मंदिराचे उत्पन्न 31 कोटी 20 लाख रुपये इतके होते. यंदा मात्र ते केवळ 4 कोटी 60 लाख इतकेच झाल्याने जवळपास 27 कोटी रुपयांची घट झाली आहे. कोरोनाच्या वर्षात आषाढी, कार्तिकीसह कोणतीही यात्रा होऊ शकली नव्हती. याशिवाय दर तीन वर्षातून येणारा अधिक मास देखील कोरोनाच्या काळात आल्याने भाविकांना येथे येता आले नाही. खरेतर अधिक महिना असल्याने इतरवेळी उत्पन्नात 7 ते 8 कोटींची वाढ होत असते. मात्र, कोरोनामुळे देवाच्या तिजोरीतले इन्कमिंगही कोरोनामुळे बंद झाले. असे असले तरी मंदिर व्यवस्थापनाने वर्षभर कोरोना काळात जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च कोरोना रुग्णांसाठी केला.
मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी रुपये देताना पंढरपुरातील पोलिसांच्या मदतीला वर्षभर नाकाबंदीसाठी 50 कमांडो पुरवत त्यांचा 25 लाखांचा खर्च उचलला. कोरोना लॉकडाऊन काळात परराज्यातील अडकलेल्या जवळपास 10 हजार मजुरांचा 3 महिने जेवणाचा सारा खर्च मंदिराने उचलला. याशिवाय शहरातील निराधार, भिकारी यांना रोज दोनवेळच्या जेवण देण्याची सेवा मंदिराने बजावली. पंढरपूर परिसरातील मुख्य जनावरांना चारा, कोरोना रुग्णांसाठी हायफ्लो ऑक्सिजन मशीन आणि भाविकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप मंदिराकडून करण्यात येत होते. कोरोनामुळे मंदिराची तिजोरी रिकामी पडली असताना कोरोना उपाययोजनांसाठी विठुराया मात्र आघाडीवर राहिला होता. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने यंदाही देवाची तिजोरी मोकळीच राहणार असली तरी विठुराया पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. यंदाही आलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची तयारी मंदिर व्यवस्थापनाने ठेवली आहे.