Amravati Congress Agitation : पेट्रोल, डिझेलला श्रद्धांजली, तर लाकडाच्या मोळीची पूजा, काँग्रेसच्या महिला आघाडीचं अनोखं आंदोलन
महागाईच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. इंधन दरवाढीच्या विरोधात अमरावतीमध्ये महिला काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं.
Amravati Congress Agitation : सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणसांच्या खिशाला झळ बसत आहेत. या महागाईच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. इंधन दरवाढीच्या विरोधात अमरावतीमध्ये महिला काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. शहरातील राजकमल चौकात काँग्रेसच्या महिलांनी अनोख आंदोलन केलं आहे. पेट्रोल, डिझेलला श्रद्धांजली, तर लाकडाच्या मोळीची पूजा करुन काँग्रेसच्या महिला आघाडीनं हे आंदोलन केलं.
इंधन दरवाढ विरोधात विरोधक आक्रमक झाले आहे. या महागाईच्या मुद्यावरुन केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आज अमरावती शहरातील राजकमल चौकात काँग्रेसच्या महिलांनी उपहासात्मक श्रद्धांजली देऊन आंदोलन केलं. महाग झालेल्या गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलला श्रद्धांजली आणि लाकडाच्या मोळीची पूजा यावेळी करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. प्रत्येक घरामध्ये महागाईनं असंतोष निर्माण केला आहे. महागाईने सर्वांचे बजेट बिघडवल्यानं केंद्रातील भाजप सरकारविरोधात अमरावतीत काँग्रेसच्या महिलांनी हे अनोखं आंदोलन केलं.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये देखील महागाईच्या मुद्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरात महागाईविरोधात आज आंदोलन करण्यात आले. शिवाजी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रिकामे सिलेंडर डोक्यावर घेत महागाईचा निषेध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.
घरगुती बाजारात ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आज सलग 33व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. ग्लोबल मार्केटमध्ये कच्च तेल महाग होत आहे. त्यानंतरही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीदेखील पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात 6 एप्रिल रोजी तेलाच्या किमतीत 80-80 पैशांनी वाढ झाली होती. तेव्हापासून इंधन दर वाढलेले नाहीत. दुसरीकडे घरघुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कालपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1020 रुपये असणार आहे. आधी ही किंमत प्रति सिलेंडर 970.50 रुपये इतकी होती.
महत्त्वाच्या बातम्या: