Bharat Jodo: आज 'भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस, राज्यात 14 दिवस असलेल्या यात्रेत महत्वाचं काय काय घडलं..
Raul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रा आज राज्यातील आपला 14 दिवसांचा प्रवास पूर्ण करत मध्य प्रदेशमध्ये पोहचत आहे.
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा राज्यातील आजचा शेवटचा दिवस आहे. 14 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये धडकलेली ही यात्रा आज जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. भारत जोडो यात्रेच्या या 14 दिवसांच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राज्यातील भारत जोडो यात्रा राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन आज मध्ये प्रदेशमध्ये पोहोचत आहे.
भारत जोडो यात्रेने 7 नोव्हेंबरला तेलंगणातून देगलूरमार्गे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला होता. त्यावेळी या यात्रेंचं महाराष्ट्रात जंगी स्वागत करण्यात आलं. देगलूरमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राहुल गांधी यांनी अभिवादन केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी देगलूरमधील गुरुद्वाराला भेट देऊन राहुल गांधींनी आपल्या यात्रेची सुरुवात केली. नांदेडनंतर ही यात्रा हिंगोलीत गेली.
आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत
भारत जोडो यात्रा हिंगोलीत असताना या यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली. आदित्य ठाकरे यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर यांच्यासह इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीचे नेते सामिल
यात्रेच्या 64 व्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे याही राहुल गांधींसोबत नांदेडमध्ये यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हेही सहभागी झाले होते. नंतर आमदार रोहित पवार हे देखील राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाक्यावरुन पैनगंगा नदी ओलांडत भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दाखल झाली.
राज्यातील लेखक-कलाकारांचा भारत जोडोला पाठिंबा
राज्यातील 250हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार राहुल गांधीच्या यात्रेत पाहायला मिळाले. लेखक, साहित्यिक दत्ता भगत , गणेश देवी, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत क्षीरसागर,विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह काही अन्य लेखकांनी राहुल गांधींशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच एक पत्रही त्यांना दिले. ज्यात या लेखकांनी काही मागण्या केल्या आहेत. सध्याचे सरकार आम्हाला पसंत नाही. तुमचेही सॅाफ्ट हिंदुत्वही आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका देखील लेखकांनी राहुल गांधींसमोर मांडली.
सावरकरांच्या माफीनाम्याचे राहुल गांधींनी केलं वाचन
यात्रेदरम्यान 17 नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचे वाचन केले. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ते पत्रही दाखवले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीदेखील हा माफीमाना वाचावा असे गांधी म्हणाले. माझ्या वक्तव्यावरुन जर कोण यात्रा रोखणार असेल, तर त्यांनी रोखावी यात्रा असं आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिलं. सरकारला जर वाटलं ही भारत जोडो यात्रा रोखली पाहिजे, तर त्यांनी यात्रा रोखावी, आम्हाला भारत जोडायचा आहे असं राहुल गांधी म्हणाले.
शेगावमध्ये गजानन महाराजांचे दर्शन आणि सभा
भारत जोडो यात्रा बुलढाण्यातील जळगावात पोहोचल्यानंतर शेगाव-बाळापूर मार्गावरील जवळा-वरखेड गावाजवळील या मार्गावर विष्णुपंत हरिभाऊ कानडे या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याच्या चार एकर शेतात 20 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारुन त्याभोवती एक हजार वारकरी रिंगण सोहळा करुन राहुल गांधी यांचं स्वागत केलं.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची आज शेगावमध्ये सभा झाली. सभेआधी राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतलं. राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात रांगेत उभे राहत महाप्रसाद ग्रहण केला. आपले ताट स्वत: उचलून वॉश बेसिनमध्ये नेले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. राहुल गांधी यांना मंचावर पोहोचताच वारकऱ्यांचा फेटा घालण्यात आला. या सभेआधी मनसेनं राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली. पोलिसांनी शेगावला पोहोचण्याआधीच काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.
भारत जोडो यात्रेत महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी अशी ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांची 19 नोव्हेंबर रोजी जयंती होती. त्या निमित्ताने आज भारत जोडो यात्रेत काँग्रेसची नारी शक्ती सहभागी झाली. भारत जोडो यात्रेला गजाननदादा पाटील मार्केट यार्ड, शेगाव येथून सुरुवात झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या महिला खासदार, आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या यात्रेत सहभाग नोंदवला.
आज 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा जळगाव जामोद येथून निघून निमखेडी फाटा येथे ही पदयात्रा पोहचली. निमखेडी फाटा येथे युनिटी ऑफ लाईट हा एक छोटेखानी कार्यक्रम सायंकाळी 6. 30 वाजता होईल. त्यावेळी रंगीत विद्युत दिव्यांच्या सहाय्याने शानदार प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर पदयात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे.
जळगाव जामोद याठिकाणी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी मोठी गर्दी रस्त्यावर उसळली आहे. आजच्या या यात्रेत अभिनेते अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी जळगाव जामोद पासून भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.
भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसचं महाराष्ट्र ढवळून काढण्याचं नियोजन आहे. महाराष्ट्रातील सहाही विभागात काँग्रेसकडून 'किसान रॅली'चं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व सभांना संपूर्ण गांधी कुटूंबीय उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.