विशाळगडावर पोलिसांनीच लाठीमार केला, सिलेंडर स्फोट करत घर उडवले; पोलीस अधिक्षकावर कारवाई करा; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप
Vishalgad Encroachment : विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात नुकताच हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. या प्रकरणी आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पोलीस अधिक्षकानाच जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत.
Nagpur News नागपूर : विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात (Vishalgad Encroachment) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी 14 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला होता. मात्र संभाजीराजे गडावर पोहोचण्यापूर्वीच हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक झाला. त्या हिंसाचारामध्ये वाहनांची, घरांची तसेच इतर मालमत्तांची जोरदार नासधूस करण्यात आली होती. या प्रकरणी आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पोलीस अधिक्षकानाच जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहे. सोबतच कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांच्या वार तात्काळ कारवाई करा, अशी मागणीही विजय वडेट्टीवारांनी यावेळी केली आहे.
पोलीस अधिक्षकावर तात्काळ कारवाई करा- विजय वडेट्टीवार
सरकार सुपारी घेऊन काम करत असून मन कलुषित करण्याचे काम सध्या सुरू आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात हिंसाचार होणार याची माहिती होती की तिथे काही लोकांकडून हैदोस घातला जाईल, तरी देखील पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाचा कुठलाही संबंध नसताना काही लोकांनी हौदोस घातला, याला सरकार जवाबदार आहे. 50 मीटरवर एसपी महेंद्र पंडित थांवले होते, त्यांनीच लाठीमार करण्याचा इशारा दिला. सिलेंडर स्फोट केला, घर उडवले. त्यामुळे पोलीस अधिक्षकावर कारवाई करा, कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांच्या वार तात्काळ कारवाई करा, अशी मागणीही विजय वडेट्टीवारांनी यावेळी केली आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर मांइंड कोण आहे याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
सरकारच्या अपयशावर केवळ पांघरून घालण्याचे काम सुरू
विशाळगड परिसरामध्ये यासीन भटकळ राहिल्याचे चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भटकळ कधी कोणाकडे राहिला होता याची चौकशी करणार असल्याचे मोठं विधान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. पोलिसांनी त्या संदर्भात काय भूमिका घेतली याबाबतही चौकशी करणार असल्याचे म्हटलं आहे. यावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, याबबात आता सांगून काय फायदा, तेव्हा का कारवाई केली नाही. हा सर्व प्रकार केवळ सरकारचे अपयश लपवण्याचा काम आहे. त्यांच्या अपयशावर केवळ पांघरून घालण्याचे काम होत असल्याची टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या