Rajiv Satav : पंचायत समिती सदस्य ते खासदार आणि काँग्रेसचे आश्वासक नेतृत्व...असा आहे राजीव सातव यांचा राजकीय प्रवास
काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या निमित्ताने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेली नजर...
मुंबई : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा राजीव सातव यांची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता आणि शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला होता. अखेर आज सकाळी त्यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन झालं आहे.
पंचायत समिती सदस्य, आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. राजीव सातव काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. राजीव सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे.
राजीव सातव यांचा जन्म 21 सप्टेंबर 1974 साली हिंगोली जिल्ह्यातील मसोड, तालुका कळमनुरी येथे झाला. त्यांच्या आई, रजनी सातव या शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होत्या. राजीव सातव यांनी आपलं शिक्षण पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि आयएलएस लॉ कॉलेजमधून पूर्ण केलं. 2002 साली त्यांचा विवाह झाला आणि सध्या त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोली सारख्या एका छोट्याश्या जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य ते थेट खासदार अशी अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी मजल मारली. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक बाणा असलेले राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठं योगदान दिलं. उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान या धोरणाने काँग्रेस पक्षात त्यांनी आपलं मोठं वजन निर्माण केले होतं. पक्षातही युवक काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष ते युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अशी पद त्यांनी भूषवली. शिवाय सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रित सदस्यही होते.
राजीव सातव यांची राजकीय कारकिर्द
2002 साली ते हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समिती सदस्यपदी निवडून गेले.
2007 साली ते हिंगोली जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांची कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी नियुक्ती झाली.
2008 साली ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
2009 साली ते कळमनुरी विधानसभेतुन पहिल्यांदा आमदार झाले.
2010 साली त्यांची अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
2014 साली ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि 16 व्या लोकसभेचे सदस्य झाले.
मार्च 2018 साली राजीव सातव अखिल भारतीय काँग्रेसचे ते गुजरात प्रभारी झाले.
मार्च 2020 साली त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्त झाली.
राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे काँग्रेस पक्षाचे न भरून येणारे नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rajiv Satav : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन
- Corona Vaccine : आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार, UIDAI चे स्पष्टीकरण
- नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा उन्माद; इनोव्हा गाडी महापालिका रुग्णालयात घुसवत धिंगाणा