(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur ZP : सत्ताधारी सदस्य पुन्हा जाणार सहलीवर; कॉंग्रेसचा सावध पवित्रा
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत कोणतीही 'रिस्क' घेण्याच्या तयारीत कॉंग्रेस नसून गेल्या निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत सर्व सदस्यांना सहलीवर घेऊन जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
Nagpur News : अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष (ZP) आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीतील अनुभवानंतर सत्ताधारी कॉंग्रेस सावधगिरीने पावले टाकत असून विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत सर्व सदस्यांना सहलीवर घेऊन जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
चार विषय समिती सभापती पदासाठी एक नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. सध्या चारपैकी तीन सभापतीपद हे कॉंग्रेसकडे (Congress) असून एक पद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (NCP) आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दोन पदांची मागणी होत असली तर कॉंग्रेसकडून एकच पद देण्याची शक्यता आहे. या पदासाठी कॉंग्रेसकडे अनेक दावेदार आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार पद देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या माध्यमातून सावनेर व हिंगणा विधानसभा (Hingna Assembly constituency) मतदारसंघाला पद मिळाले आहे. त्यामुळे आता उर्वरित चार मतदारसंघांकडे चार सभापती पद जाण्याची शक्यता आहे.
बंडखोरांची मदत; भाजपला यश!
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला फुटीची लागण झाली. कॉंग्रेसमधील तीन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका सदस्याने बंडखोरी करत भाजपची मदत घेतली. भाजपनेही (BJP) बंडखोरांच्या मदतीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले.
राष्ट्रवादीलाही सोबत घेणार का कॉंग्रेस?
कॉंग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनीच माजी मंत्री केदारांविरोधात बंड करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप बंडखोर सदस्य नाना कंभाले यांनी लावून मोठी खळबळ उडवून दिली आहे. या निवडणुकीतही असा प्रकार होण्याची शंका आहे. भाजपचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या निवडणुकीसाठीही कॉंग्रेस आपल्या सदस्यांना सहलीच्या निमित्त एकत्र ठेवणार आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यांनाही सोबत घेण्याची चर्चा आहे.
इच्छुकांची भाऊगर्दी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्तापक्ष कॉंग्रेसने (Congress) सत्ता कायम राखली असली तरी बंडखोरीचाही सामना करावा लागला. जेष्ठांना डावलले गेल्याने सत्तापक्षामधील सदस्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. त्यातच आता सभापतीपदाची निवडणुक होणार असल्याने बंडखोरीची मालिका कायम राहणार आहे. आरक्षण आणि नेत्यांच्या निर्णयामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद हुकलेल्या इच्छुकांचा डोळा 'मलाईदार' विषय समिती सभापती पदावर आहे.
महत्त्वाची बातमी