आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ, परीक्षेचं काम दिलेली कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये? आरोग्यमंत्री म्हणाले परीक्षा होणारच
राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्यानं गोंधळ उडाला आहे
![आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ, परीक्षेचं काम दिलेली कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये? आरोग्यमंत्री म्हणाले परीक्षा होणारच Confusion of health department exams, company that gave the exam work is in the black list? The health minister said there would be an examination आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ, परीक्षेचं काम दिलेली कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये? आरोग्यमंत्री म्हणाले परीक्षा होणारच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/27/1aa1992b46f820b2921212dca07d6a3a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री दिली होती.
नेमकं का घडला हा प्रकार
नोव्हेंबर 2016 मध्ये पंजाब सरकारने NYSA या कंपनीला तेथील गैरकारभार प्रकरणी तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केले. पुढे उच्च न्यायालयातून ही कंपनी ब्लॅकलिस्ट मधून बाहेर पडली. 2017 ला महाराष्ट्रातील FYJC म्हणजे अकरावी एडमिशन लिस्टचे काम NYSA Asia या कंपनीला दिले गेले, त्यातील पोर्टल मध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येऊन काही काळासाठी या कंपनीचे पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने या कंपनीवर काहीही कार्यवाही/दंड केला नाही.
Health Department Exam : आरोग्य विभागाची परीक्षा महाराष्ट्रात, केंद्र नोएडात; हॉल तिकीट गोंधळावर राजेश टोपे म्हणाले....
जुलै 2018 ला उत्तरप्रदेशातील UPSSC च्या अजून एका परीक्षेचे कंत्राट NYSA कडे होते. या परीक्षेत परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फोडून पेपर लीक करण्यात आला, काही विद्यार्थांच्या सतर्कतेमुळे ही बाब लक्षात आली त्यामुळे परीक्षेच्या एक दिवस आधी एजंट लोकांना पोलिसांनी पकडुन सदर परीक्षा रद्द करायला लावली. या परीक्षेनंतर UPSSC ने NYSA ला ब्लॅकलिस्ट केले. NYSA याविरुद्ध उच्च न्यायालयात गेल्यावर, UPSSC ने NYSA ची बाजू न ऐकताच ब्लॅकलिस्ट केले, असा ठपका कोर्टाने ठेवला आणि ब्लॅकलिस्ट मधून काढले. आता हे सगळं असताना महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ या कंपनीने घातला त्यानंतर महाराष्ट्र सरकार या कंपनीवर आता नेमकी काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.
राजेश टोपे काय म्हणाले....
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्य शासनाची जबाबदारी प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम होतं ते त्यांनी केलं. बाकीचं काम कंपनीचं होतं. परीक्षा 100 टक्के होणार आहे. परीक्षा रद्द झालेली नाही. कंपनीनं आठ ते दहा दिवस मागितलेले आहेत. परीक्षा पोस्टपॅन झाली आहे. कंपनीनं असमर्थता दाखवल्यामुळं आपल्याकडं पर्याय नव्हता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं राजेश टोपे म्हणाले. उद्याच बैठक घेऊन परीक्षेची तारीख ठरवली जाईल, असं ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते फडणवीसांची टीका
आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोळ घातला आहे. प्रवेश पत्र देताना कुणाला उत्तर प्रदेश तर कोणाला इतर ठिकाणचे प्रवेश पत्र दिले. पण आम्हाला माहिती यात मिळाली आहे की आरोग्य विभागाच्या परीक्षेत भरतीसाठी दलाली केली जात आहे. एका एका उमेदवाराकडून पाच ते सात लाख रुपये वसुली केली जात आहे असा आम्हाला सांगण्यात येतंय, असा आरोप फडणवीसांनी केला. या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे. हे दलाल नेमके कोण आहे ते समोर आले पाहिजे. हे सरकार सातत्याने घोळ करत आहे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)