सांगलीत आज रात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन तर उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू
कोरोनाबाधितांची संख्या यापुढेही मर्यादित राहावी यासाठी सांगलीत आज म्हणजेच 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये आज रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात उर्वरित ग्रामीण भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. लॉकडाऊनची नियमावली जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असून या लॉकडाऊनमध्ये 1-2 आस्थापने सुरु राहतील. बाकी ग्रामीण भाग सोडून सर्वत्र कडकडकीत लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत.
कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलैपर्यंत सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन आणि उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालन करावं, असं प्रशासनाने म्हटलं आहे. या ठिकाणाहून लोकांना बाहेर किंवा बाहेरील लोकांना या ठिकाणी येता येणार नाही. जनता कर्फ्यूच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालन करावे असे आवाहन सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
लॉकडॉऊनबाबतची नियमावली जिल्हाधिकारी आज जाहीर करणार दरम्यान लॉकडाऊन काळात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार हे प्रशासनाने अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यामुळे खरेदीसाठी मंगळवारी लोकांची बाजारपेठेत झुंबड उडाली होती. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन झालं.
लॉकडाऊन नियमावलीबाबत संभ्रमावस्था कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन नियमांची कडक अंमलबजावणी झाली . त्याचा मोठा फटका विविध घटकांना बसला. अनलॉक झाल्यानंतर व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. आता बुधवारपासून पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. मात्र त्याचे नियम अद्यापही जाहीर न केल्याने व्यापारी, शेतकरी आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. पेट्रोल पंप, बँका, शासकीय कार्यालये सुरु राहणार का, लॉकडाऊन काळात संचारबंदी लागू होणार का, असे अनेक प्रश्न लोकांसमोर आहेत.
महापालिका क्षेत्रात रॅपिड अँटीजेन चाचण्या सुरु महापालिका क्षेत्रातील कंटेन्मेंट झोनमधील 50 वर्षांवरील नागरिक तसेच बहुविध आजार असणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यास संबंधित रुग्णास तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करुन पुढील उपचार केले जाणार आहेत. महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने घर टू घर सर्व्हे करण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी आणि त्यांच्या आजाराची माहिती घेण्यात येत आहे. त्यातच आता रॅपिड अँटीजेन चाचणीही करण्यात येणार आहे. 50 वर्षांवरील नागरिक तसेच बहुविध आजार असणाऱ्या व्यक्तींची चाचणी होणार आहे. या चाचणीमुळे अवघ्या अर्ध्या तासात अहवाल मिळून नागरिकांना कोरोना आहे की नाही ते स्पष्ट होईल. त्यामुळे अहवाल पॉझिटिव्ह आल्यास या संबंधितांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत संलग्न असणारी तीन खाजगी रुग्णालये सध्या कोविड-19 वरील उपचारासाठी घेण्यात आली असून यापुढेही खाजगी रुग्णालये कोविड-19 वरील उपचारासाठी घेण्यात येतील.