कौतुकास्पद! पुण्याच्या दवाखान्यातून येताच 'ते' 14 दिवस शेतात क्वॉरंटाईन
शहरांतील कोरोनाचा वाढता आकडा पाहून अनेक नागरिक आपल्या मूळ गावी परतत आहेत. पण तिथे गेल्यानंतर नियमांनुसार, क्वॉरंटाईन होणं टाळत असून त्यामुळे गावाकडेही कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. अशातच बारामतीमधील दिलीप खोमणे यांनी सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
बारामती : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पुणे-मुंबईतून अनेक लोक आपल्या मूळ गावी येत आहेत. मात्र काही जणांनी काळजी न घेतल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. याचमुळे गावातही कोरोना वेगाने फोफावताना दिसत आहे. पुणे मुंबईहून येणाऱ्या लोकांनी स्वतःला 14 दिवस क्वॉरंटाईन करणं गरजेचे आहे. शासनाने तसे आदेशही दिले आहेत. मात्र अनेक ठिकाणी हा आदेश पाळला जात नसल्याने आता ग्रामीण भागातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र बारामतीतील कोर्हाळे खुर्द येथील तंटामुक्ती गावचे माजी अध्यक्ष दिलीप खोमणे यांनी एक आदर्श घडवून दाखविला आहे.
बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द येथील दिलीप खोमणे यांच्या मुलीला प्रसूती काळात त्रास झाल्याने तिला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर या सर्वांची तिथे तपासणी करण्यात आली. मात्र आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला आणि गावाला धोका नको, या भावनेतून त्यांनी गावापासून आणि कुटुंबापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या ससून रुग्णालयात अनेक कोरोनाग्रस्तांवरती उपचार सुरू आहेत. याठिकाणी विविध रोगांनी आजारी असलेल्या नागरिकांनाही संसर्ग झाल्याने त्यांनाही कोरणाची लागण झालेली आहे. अशी अनेक उदाहरणे पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्यापासून आपल्या कुटुंबाला आणि गावाला कोणताच धोका होऊ नये म्हणून घरी येताच खोमणे यांनी त्यांच्या शेतातील जांभळीच्या झाडाखाली 14 दिवस काढले.
पाहा व्हिडीओ : कोरोनामुळे माणसांसोबत प्राण्यांचंही स्थलांतर, 'टायगर'चा कोलकाता ते सांगली 2 हजार किलोमीटरचा प्रवास!
खोमणे यांना क्वारंटाईनच्या काळात त्यांची सून घरूनच जेवण देत होती. यावेळी त्यांच्या जेवणाची भांडी देखील वेगळी ठेवण्यात आली होती. जेवण देताना त्यांची सून या भांड्यांना कोणताही स्पर्श न करता त्यांना जेवण देत असे. तसेच खोमणे हे या चौदा दिवसांत स्वतःची कामं स्वतः करत होते. शेतात पडलेले ही कामं ते स्वतः करत होते. या चौदा दिवसांत घरच्यांचा आणि कोणाचाही संपर्क होऊ नये याची ते तंतोतंत पणे काळजी घेत होते.
सध्या त्यांचा चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण करून ते नुकतेच घरी आले आहेत. त्यामुळे खोमणे यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे त्यांचे सहकारी मित्र सांगत आहेत. सध्या अनेक लोक पुणे आणि मुंबई प्रवास करून आल्यानंतर क्वॉरंटाईन होणं टाळतात आणि स्वतःच्या कुटुंबियांसोबत गावकऱ्यांचंही आरोग्य धोक्यात घातलात. अशा लोकांनी खोमणे यांचा आदर्श घ्यावा आणि गाव, कुटुंब सुरक्षित ठेवावं. त्यामुळे बारामतीतील कोर्हाळे खुर्द येथील तंटामुक्ती गावचे माजी अध्यक्ष दिलीप खोमणे यांनी एक आदर्श घडवून दाखविला आहे.
संबंधित बातम्या :
बीडमधील शिक्षकांना 'डिलिव्हरी बॉय'चं काम, मराठवाडा शिक्षक संघाची निर्णय मागे घेण्याची मागणी
कोरोनामुळे लोकसंख्या वाढण्याची शक्यता : रिसर्च
रत्नागिरी जिल्ह्याला मोठा दिलासा, कोरोना तपासणी केंद्र उभारण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी