(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलाईनमध्ये झुरळ! नातेवाईकांचा आरोप, बार्शीतील प्रकार, रुग्णालयानं आरोप फेटाळले
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये सलाईनमध्ये झुरळ निघाल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे. बार्शीतील प्रसिद्ध अशा डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप केला आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये (solapur barshi) सलाईनमध्ये झुरळ निघाल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे. बार्शीतील प्रसिद्ध अशा डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार निहिरा नीरज पुराणिक या तीन वर्षीय बालिकेला 27 ऑगस्टला ब्रॉकायटीस आणि निमोनियाचा त्रास होत असल्याने डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते.
त्यानंतर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार देखील सुरु होते. मात्र त्यातील एक सलाईन ठराविक कालावधीनंतर नंतर बंद पडत होता. तेव्हा या सलाईन बॉटलची तपासणी केल्यानंतर त्यात चक्क झुरळ आढळल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच या बॅचमधील आणखी किती बॉटल रुग्णांना दिले गेलेत याची ही चौकशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान निहिरा पुराणिक हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून तिची तब्येत सध्या व्यवस्थित असल्याची ही माहिती आहे.
Instagram ला माहितीची चोरी होण्यापासून सावध केलं, बार्शीतल्या युवकाला फेसबुककडून 22 लाखांचं बक्षीस
स्वतःचा उद्देश साध्य करण्यासाठी आरोप, रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले
जगदाळे मामा हॉस्पीटलमध्ये सलाईनमध्ये झुरळ आढळल्याचे दावा रुग्णाच्या नातेवाईकतर्फे करण्यात आला होता. मात्र हे सर्व आरोप रुग्णालयाने फेटाळून लावले आहेत. सदरील रुग्णांवर उपचार झाले होते. डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. रुग्ण वयाने लहान असल्याने सारखे हात हलवत असल्यामुळे सलाईन आऊट झाले होते. मात्र सलायनमध्ये कुठलाही किडा देखील नव्हता. स्वतःचा उद्देश साध्य करण्यासाठी रुग्णाच्या काही नातेवाईकांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केला असल्याचे स्पष्टीकरण डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल प्रशासनातर्फे अधीक्षक डॉ. आर. व्ही. जगताप यांनी दिले आहे.
जगदाळे मामा हॉस्पिटल हे बार्शीतील प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. या ठिकाणी बार्शी तालुक्यासह शेजारील जिल्ह्यातून देखील रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपामुळं बार्शीत चर्चेला ऊत आला आहे.