कोस्टल रोडच्या कामातील अडथळे दूर, सर्व परवानग्या प्राप्त, मंत्री गोयल यांच्या प्रयत्नांना यश
कोस्टल रोडच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.

Coastal Road Mumbai : सागरी महामार्गासाठी खार जमिनीचे हस्तांतरण करण्यापासून ते भू संपादन, सीआरझेड, पर्यावरण मंत्रालय तसेच वनखात्याच्या परवानग्या मिळाल्याने या मार्गाच्या कामातील अडथळे दूर होत लवकरच हे काम मार्गी लागत असल्याची माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दिली. उत्तर मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पीयूष गोयल यांनी रविवारी बोलावलेल्या आढावा बैठकीला महापालिका, एमएमआरडीए, ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण मुंबई तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही लाभ होणार
सागरी महामार्गाचे काम मार्गी लागावे यासाठी पीयूष गोयल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या प्रगतीबाबत माहिती देताना पीयूष गोयल म्हणाले की राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांकडे पाठपुरावा घेत परवानगी मिळवण्यात येत असल्याने आता हे काम लवकरच सुरू होईल. या सागरी महामार्गाचा लाभ केवळ उत्तर मुंबईतील नागरिकांनाच होणार नसून संपूर्ण मुंबई तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही त्याचा लाभ होणार आहे. पुढे दहिसर आणि विरारपर्यंत या मार्गाचे काम सुरळीत होणार आहे. त्याचप्रमाणे मढ - वर्सोवा पुलाचे कामही मार्गी लावण्यात आले आहे तर बोरीवली - ठाणे टनेलचे काम दोन महिन्यात होणार आहे.
बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. वेळेच्या मर्यादेचा भंग करून खासगी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर या मार्गावर येत असतात. त्यामुळे मेट्रोची कामे करणाऱ्या 108 वाहनांना आणि कचरा हटवणाऱ्या वाहनांना विशिष्ट फलक लावण्यात येणार आहेत. तर महापालिकेचा फलक लावून वाहतूक करणाऱ्या बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना पीयूष गोयल यांनी दिल्या. या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी होणारी तीन ठिकाणे हेरून तेथील समस्याही दूर करण्यात येणार आहेत.
उत्तर मुंबईतील दहा तलावांची पाहणी करून त्यांची स्वच्छता, गाळउपसा करून ते पुनर्जीवित करण्यात येतील तसेच त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात येत असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली. हे काम खासगी आणि सरकारी भागीदारी तत्वावर केले जाणार आहे. गोराई आणि चारकोप परिसरातील पाणीटंचाईच्या समस्यांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. त्याची दखल घेत येथील पाईपलाईनची पाहणी करून पाणी गळती रोखण्यापासून दाब वाढवण्यापर्यंतची उपाययोजना तातडीने सुर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पे अँड युज तत्वावर 79 प्रसाधन गृहे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी 58 प्रसाधनगृहांची मोठ्या प्रमाणावर तसेच 21 प्रसाधनगृहांची किरकोळ डागडुजी करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यांची स्वच्छता आणि सफाई करण्याचे काम खासगी कंपन्यांकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.
खारफूटीची नासधूस करून अतिक्रमण करणाऱ्या झोपडीदादांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश
एसआरए योजनेतील जे बिल्डर रहिवाशांना वेळेवर घरांचा ताबा देत नाहीत अथवा ताबा प्रमाणपत्र देत नाहीत अशा बिल्डरना काळया यादीत टाकून पुढील योजनांसाठी त्यांना परवानगी देण्यात येऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना पीयूष गोयल यांनी एसआरए आणि महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. खारफूटीची नासधूस करून अथवा जाळून तेथे अतिक्रमण करणाऱ्या झोपडीदादांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका, पोलिस आणि वनविभागाला देण्यात आले आहेत. भरणी करणाऱ्या ट्रकचालकांवरही पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.
उत्तर मुंबईत कचऱ्याचे ढीग दिसल्यास महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल तसेच नागरिकांमध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. यावेळी उत्तर मुंबईतील आमदार योगेश सागर, संजय उपाध्याय, मनीषा चौधरी, प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, भाई गिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
























