(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : एक तारीख - एक तास! १ ऑक्टोबर रोजी राज्यभर स्वच्छता मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Eknath Shinde : महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आधी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी राज्यभर स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुंबई : 'स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा'या अभियानाअंतर्गत राज्यभर स्वच्छता मोहिम (Cleaness Campaign) राबवण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी 1 ऑक्टोबर रोजी राज्यात सगळीकडे एक तारीख - एक तास ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. दरम्यान या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकजण जिथे कुठे असेल तिथे स्वच्छता किंवा साफसफाई करुन या अभियानामध्ये सहभाग घेू शकेल.
राज्यभरातील खेड्यापाड्यांपासून ते शहरांपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून या मोहीमेची सुरुवात करण्यात येईल. तसेच यामध्ये सफाई मित्र देखील सहभागी होऊ शकणार आहेत. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारी विशेष शिबिरे आणि प्रदर्शनांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेची गरज, त्याचे फायदे आणि महत्त्व पटवून देण्यात येईल. त्यामुळे या उपक्रमांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं ?
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे शिकवले आहेत. त्याच अनुषंगाने 'स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा' हे अभियान यशस्वी करायचं आहे. 'एक तारीख एक तास' या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी महाराष्ट्र राज्यात स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ केला. त्यामाध्यमातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ करण्याचे उद्देश सध्या राज्य सरकारसमोर आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ' महाराष्ट्रातील परिसर स्वच्छ करण्यासाठी अनेक थोरा- मोठ्यांनी चांगल्या सवयीचा मंत्र दिलाय. तर संत गाडगेबाबांनी देखील हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिलेत. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील.'
तर 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वीपणे राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटलं. तसेच हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा :