Nitin Gadkari : 30 टक्के लोकसंख्या गावं सोडून शहरात गेली कारण....नितीन गडकरींनी सांगितली शेतकऱ्यांची व्यथा
विविध कारणामुळं शेतकऱ्यांचे स्थलांतर वाढले आहे, गावातील लोकं शहराकडे येत असल्याचे वक्तव्य मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.
Nitin Gadkari : गावात चांगले रस्ते नाहीत. शिक्षणाच्या सुविधा नाहीत, स्वच्छ पाण्याची उपलब्धता नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्यामुळं रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळं लोकांचं स्थलांतर होत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं. या सर्व कारणामुळं देशातील 30 टक्के लोकसंख्या गावं सोडून शहराकडे आली आहे. ती खुशीनं नाही तर मजबुरीने आली असल्याचे ते म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय शिवार फेरीच्या उद्धघाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते.
शेतमालाला हवी तेवढी किंमत मिळत नाही
शेतीमालाच्या दराचा संबंध मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. लिंबू, संत्रा स्वस्त आहे, सरबत महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्कीड महाग आहे. शेतमालाला जेवढी हवी तेवढी किंमत मिळत नसल्याचे गडकरी म्हणाले. आपण सगळेजण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. भावाचा संबंध हा जागतिक ग्लोबल इकॉनॉमीशी असल्याचे गडकरी म्हणाले. आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. मलेशिया आणि इंडोनिशियातून तेलाची आात केली जाते. सूर्यफूलाचे तेल युक्रेनमधून, सोयाबीनचे तेल अर्जेंटीनामधून आयात होते असे गडकरी म्हणाले.
कृषी विद्यापीठांनी जागतिक स्तरावर कोणत्या मालाचा किती स्टॉक याची माहिती द्यावी
केंद्र सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून दरवर्षी हमीभावात वाढ करते. आज परिस्थिती अशी आहे की, हमीभाव जास्त आहे आणि मार्केटमध्ये दर कमी आहेत. यासाठी सरकारला दीड लाख कोटी द्यावे लागत असल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी कृषी विद्यापीठाला सल्ला देखील दिला. सगळ्या शेतकऱ्यांकडे मोबाईल आहेत, विद्यापाठीने एक वेबसाईट उघडावी. त्यामध्ये मे आणि ऑक्टोबर दोन महिन्यात शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर कोणत्या मालाचा किती स्टॉक शिल्लक आहे. त्याची विक्री किती झाली आहे, यासंदर्भातील माहिती द्यावी. त्याआधारे शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याची माहिती द्यावी असे गडकरी म्हणाले.
...तर गुजरातऐवजी विदर्भातील कापसाला मागणी वाढेल
विदर्भातील कापसाला किंमत का मिळते कारण येथील मोठ्या प्रमाणातील कापूस जीनींग प्रेसमधून बांगलादेशमध्ये जातो. कोविड काळात बांगलादेशमध्ये कापूस निर्यात कमी झाला, त्यामुळं किमंती कमी झाल्याचे गडकरी म्हणाले. विदर्भातील कापूस बांगलादेशमध्ये नेण्यासाठी एका कंटेनरमागे दोन लाख रुपयांचा खर्च येतो. कापसाला दर मिळवायचा असेल तर मुंबईचा समुद्र विदर्भात आणला पाहिजे अशी संकल्पना मी मांडली होती. आता रेल्वेने कापूस कोलकातामध्ये जाईल, तिथून नदीमार्गाने कापूस बांगलादेशमध्ये जाईल. याबाबत बांगलादेशच्या मंत्र्यांशी मी बोललो आहे. त्यामुळं एका कंटेनरमागे एक ते दीड लाख रुपये वाचतील. त्यामुळं विदर्भातील कापसाला मागणी वाढेल णि त्यातीन किंमतीत वाढ होईल असे गडकरी म्हणाले. बांगलादेशला गुजरातचा कापूस घेण्यासाठी दोन लाख रुपयांचा खर्च येतो आणि विदर्भातील कापूस घेण्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च येईल, त्यामुळं बांगलादेशचे व्यापारी विदर्भाचा कापूस घेतील असे गडकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: