Nagpur : नागपूर रेल्वे स्थानकावर विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; अनेक गुन्हेगारांचा रेल्वे स्टेशन परिसरात आसरा
मारहाण करणारे परप्रांतातील अनेक युवक गुन्हा केल्यानंतर नागपुरात पळून येतात. रेल्वे स्थानकावर आसरा घेतात. त्यामुळे स्थानकावर घटना घडतात, अशी माहिती आहे. यावर कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
Nagpur Railway Station Crime News : नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर ओळखपत्र नसलेल्या परप्रांतीय पाणी विक्रेत्यांमध्ये क्षुल्लक कारणातून तुफान हाणामारी झाली. यात लोहमार्ग पोलिस व प्रवाशांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. अरविंद आनंदा (वय 22), छोटू शंकर (वय 22), महेन सोनकर (वय 20) आणि बाबू सोनकर (वय 20) अशी पाणी विक्रेत्यांची नाव आहे. सहा महिन्यांपासून ते बजेरियात राहतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे पोलिसांनाही आश्चर्यचा धक्का बसला. जखमींवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पेटी कॉन्ट्रॅक्टर सुरज...
रेल्वे स्थानकावर सूरज हा रेल नीरचा पेटी (सब) कंत्राटदार आहे. रेल्वेत रेल नीर हे बाटलीबंद पाणी बंधनकारक आहे. त्यामुळे रेल्वे आणि फलाटावर हेच बाटलीबंद पाणी विकले जाते. रेल नीरचा ट्रक खाली करणे, पाण्याचे क्रेट स्टेशनच्या आत घेऊन जाने तसेच रेल्वेत विकणे आणि मागणीनुसार पेंट्रीकार चालकाला देणे असे सूरजचे काम आहे.
अशी घडली घटना...
सकाळी 10 वाजताच्या सुमारास चारही युवक फ्लॅटफार्म क्रमांक 6 वर होते. अतिशय क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. एकमेकांचा चावा घेतला, गळा आवळला. दरम्यान छोटूने इतर सहकाऱ्यांना बोलाविले. त्यांनी बाबूला मारहाण केली. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने वाद निवळला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस अवधूत डोळस यांनी चारही युवकांवर अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली. असे परप्रांतातील अनेक युवक गुन्हा केल्यानंतर नागपुरात पळून येतात. रेल्वे स्थानकावर आसरा घेतात. त्यामुळे स्थानकावर अशा घटना घडतात, अशी माहिती आहे.
दारुच्या दुकानात चाकूच्या धाकावर मागितली खंडणी
दुसऱ्या एका घटनेत शहरातील सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गड्डीगोदाम चौकात असलेल्या देशी दारूच्या दुकानात शिरून 30 वर्षीय आरोपीने 10 हजारांची खंडणी मागितली. ही घटना सांयकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली असून, सदर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिण्या उर्फ मिथून दिनगिरी गोसाई (वय 30, रा. कामठी रोड, सुंदरबाग) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गड्डीगोदाम चौकात गायकवाड देशी दारू दुकान आहे. या दुकानात सायंकाळच्या सुमारास रोखपाल अल्फी आरी फिलीप (वय 50, रा. मेकोसाबाग, ख्रिश्चन कॉलनी, जरीपटका) हे दुकानाच्या काउंटरचे आत बसले होते. तिथे मिथून गोसाई आला. त्याने 'मुझे महिने का 10 हजार रुपये और फुकटमें दारू देना पडेगा' असे म्हणून दुकानातून दारू मागितली. मात्र, रोखपालाने व त्याच्या सोबतच्या व्यक्तीने ते देण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या मिथूनने त्यांना अश्लील शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी दारूच्या बाटल्या घेऊन निघून गेला.
ही बातमी देखील वाचा...