Kirit Somaiya : अनिल परबांचं रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही; किरीट सोमय्यांचा दावा
शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सही केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे.

Kirit Somaiya : माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सही केल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) दिली आहे. त्यामुळं अनिल परब यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट दिवाळीपर्यंत इतिहासजमा होणार असल्याचे सोमय्या म्हणाले. काल (24 ऑगस्ट) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केल्याचे ते म्हणाले. सोमय्यांनी केलेला दावा हा अनिल परबांसाठी धक्का मानला जात आहे.
दिवाळीपर्यंत अनिल परब यांचा रिसॉर्ट इतिहासजमा होणार
दरम्यान, आता पर्यावरण मंत्रालयकडे ही फाईल गेली आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना आदेश दिले जाणार असल्याचे मला सांगितल्याचे सोमय्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात रत्नागिरी जिल्हाधिकारी हे त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती देखील सोमय्यांना दिली. शनिवारी मी दापोलीला यात्रा करणार आहे. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचा रिसॉर्ट इतिहासजमा होणार आहे. रिसॉर्ट पडणार शिवाय या रिसॉर्टसाठी लावलेले पैसे कोठून आले याची देखील तपासणी होणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
सोमय्यांचे आरोप काय
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते. साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.
पुढच्या दोन-चार दिवसात सुजीत पाटकर यांना अटक होणार : सोमय्या
32 कोटी 53 लाख रुपये महापालिकेने सुजीत पाटकर यांच्या खात्यात जमा केले. त्यामध्ये 4 कोटी 57 लाख वरळी कोव्हीड सेंटरचे होते त्याचे पुरावे आम्ही दिले असल्याची माहिती देखील किरीट सोमय्या यांनी दिली आहे. आज पोलीस नसल्यामुळं पुढील सुनावणी 30 ऑगस्टला होणार आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनवरुन हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडं वर्ग होत आहे. त्यामुळं पुढच्या दोन-चार दिवसात सुजीत पाटकर यांना अटक होईल असेही सोमय्या म्हणाले. ईडी आणि इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनशी सुद्धा चर्चा केली आहे. त्यांनीसुद्धा लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांच्यात खोटं बोलण्याची स्पर्धा सुरू आहे: किरीट सोमय्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
