(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambadas Danve : खून, खंडणी प्रकरणातील आरोपींसोबत मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Ambadas Danve : अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून खून, खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगेला नेण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
Ambadas Danve On CM Eknath Shinde Ayodhya Tour : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी आपल्या आमदार, खासदारांसह अयोध्या दौरा केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक भाजप नेते देखील उपस्थित होते. मात्र हा अयोध्या दौरा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे. तर विरोधकांनी देखील या दौऱ्यावरून भाजप-शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान याचवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्वीट करत या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून खून, खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगेला नेण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी एक फोटो देखील ट्वीट केला आहे.
अंबादास दानवे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "काय हा 'फडतूस'पणा?... अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून, खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून...आता हे तुम्हाला चालते का? देवेंद्र फडणवीस जी?... असे दानवे यांनी म्हटले आहे.
काय हा 'फडतूस'पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालते का @Dev_Fadnavis जी? https://t.co/5KjNDs3aET
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 10, 2023
कोण आहे सिद्धेश अभंगे?
अंबादास दानवे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात त्यांच्याच विमानातून कुख्यात गुंड सिद्धेश अभंगे प्रवास करत असल्याचा आरोप केला आहे. सोबतच त्यांनी एक फोटो देखील ट्वीट केला आहे. तर सिद्धेश अभंगे हा ठाण्यातील कुख्यात गुंड असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्याच्यावर ठाणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई देखील केली होती. तर याच कारवाईनंतर त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. 2020 मध्ये त्याची तुरूंगातून सुटका झाली होती. तर नाशिक कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी समर्थकांची तुफान गर्दी उसळली होती. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला होता.
जयंत पाटलांची टीका...
शिंदे गटासह भाजप नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील टीका केली आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे. अनेक भागात गारांचा पाऊस सुरु असताना सरकारचे दुलर्क्ष होत आहे. शेतकरी संकटात असताना राज्यातील मंत्री अयोध्येत जाऊन बसले आहेत. पहिल्यांदा सरकार आल्याने सर्वचसर्व मंत्रीमंडळ अयोध्येत गेले असून, दुसरीकडे शेतकरी मात्र संकटात असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :