Mumbai-Goa Highway : चांद्रयान-3 चा खर्च 615 कोटी, अपुऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च 15 हजार कोटी; महामार्ग बांधताय की चंद्रावर जाण्याची वाट?
Mumbai-Goa Highway Potholes : आजवर जेवढा खर्च मुंबई-गोवा महामार्गासाठी करण्यात आला आहे, तेवढ्यात पैशात चांद्रयान 50 वेळा चंद्रावर जाऊन आलं असतं.
![Mumbai-Goa Highway : चांद्रयान-3 चा खर्च 615 कोटी, अपुऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च 15 हजार कोटी; महामार्ग बांधताय की चंद्रावर जाण्याची वाट? Chandrayaan 3 budget vs Mumbai Goa highway budget Goa highway is more expensive than Chandrayaan Mumbai Goa highway potholes Mumbai-Goa Highway : चांद्रयान-3 चा खर्च 615 कोटी, अपुऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च 15 हजार कोटी; महामार्ग बांधताय की चंद्रावर जाण्याची वाट?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/23bce8a0fc2c54baf8bca29f61e2abbf1693062717906322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने पाठवलेल्या व्हिडीओतून लांबून दिसणारा चंद्र जवळून कसा दिसतो हे त्यामुळे समजलं. पृथ्वी आणि चंद्रावर एका गोष्टीचं साम्य आहे, ते म्हणजे खड्डे. आता चंद्रावर खड्डे असले, तरी चांद्रयान-3 चं यशस्वीरित्या लँडिंग झालं. चंद्रावरच्या खड्ड्यांमधूनही रोव्हरही नीट धावलं. पण, कोकणातला माणूस मुंबई-गोवा हायवेवरुन (Mumbai-Goa Highway) कधी नीट धावणार हा प्रश्न आहे. चंद्रालाही मागे टाकेल असा आहे आमचा मुंबई-गोवा हायवे...
मुंबई-गोवा हायवेवरच्या एका खड्ड्यातून कसंतरी बाहेर निघत नाही, तोवर पुढे दुसरा खड्डा लागतो. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. त्यात खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाजही येत नाही. ही परिस्थिती पाहून छोट्या मुलांचं ''धीरे साजना होले होले साजना'' हे गाणं आठवतं.
मुंबई गोवा महामार्गाचा खर्च आणि चांद्रयान-3 मोहिमेच्या खर्चावर एक नजर टाकूया
- मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाचा खर्च : 15 हजार कोटी
- यशस्वी चांद्रयान-3 मोहिमेचा खर्च : 615 कोटी
चंद्राची वाट स्वस्त, मुंबई-गोवा महामार्गाची महाग
गेल्या 15 वर्षात मुंबई गोवा महामार्गासाठी 15 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटींचा खर्च आला आहे. चंद्रावरच्या खड्ड्यांमधून रोव्हरने आठ मीटरचा प्रवास नीट केला. पण, मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करताना गाड्यांची अवस्था मात्र दयनीय होतं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आज एक एसटी काय बंद पडली, इतर सगळ्याच वाहनांची चाकं थांबली. मोठी वाहतूक कोंडी झाली. योगायोग असा की, त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण रस्त्याची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचले होते.
महामार्ग बांधताय की चंद्रावर जाण्याची वाट?
वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीसंदर्भात एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देण्याऐवजी ते एबीपी माझाच्या प्रतिनिधीला आधी बंद पडलेल्या एसटीपर्यंत घेऊन गेले आणि वाहतूक कोंडी कशामुळे झालीय ते बघा असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं.
महामार्गाचं काम, तब्बल 12 वर्ष रखडलेलंच
एका बसमुळे एवढं ट्राफिक झालं, पण ही बस का बंद पडली? खराब रस्त्यांमुळेच वाहनं बंद पडत आहेत, म्हणजे या सगळ्याचं मूळ काय तर खड्डेच... कोट्यवधींचा खर्च करुनही कोकणी माणसाला काय मिळतं, तर हा खड्ड्यांचा रस्ता. पण, आता बास असं म्हणत मनसेने आवाज उठवला आहे. खड्ड्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसेकडून जागर यात्रा काढली जाणार आहे. थुकपट्टी काम कोणीही करु शकतं, खड्डे बुजवणार आहात की नीट रस्ता करणार आहात, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
चांद्रयानापेक्षा मुंबई-गोवा महामार्ग महाग
मनसेच्या जागर यात्रेआधीच रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे. पण, हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे. याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हणांनी उत्तर दिलं आहे. रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं की, ''हे सर्व काम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होत असतं. जरं निकृष्ट दर्जा आणि पद्धतीचं काम झालं असेल आणि याची जर तक्रार झाली असेल. तर त्यासंदर्भामध्ये ऑडिट करण्याच्या संदर्भात आधीच यंत्रणा राबवण्यात येत आहे.''
कोकणी माणसाचा प्रवास कधी सुखकर होणार?
आजवर जेवढा खर्च मुंबई-गोवा महामार्गासाठी करण्यात आला आहे, तेवढ्यात पैशात चांद्रयान 50 वेळा चंद्रावर जाऊन आलं असतं. आता हे गतीमान सरकार मनसेच्या आंदोलनानंतर तरी कोकणी माणसाचा प्रवास कधी गतीमान करतं, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)