Chandrashekhar Bawankule : भाजप कार्यालयात दुपट्टे कमी पडताय इतके पक्षप्रवेश; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
Chandrashekhar Bawankule : आज भाजप कले-कलेने वाढत जात असून पक्ष कार्यालयात भाजपचे दुपट्टे कमी पडत आहेत, रोज इतके पक्षप्रवेश होत असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.
BJP Nagpur : सध्या महाराष्ट्रात 42 लाख अधिकृत कार्यकर्ते आपल्या भाजप (BJP) पक्षात काम करत आहे. 27 लाख लोकांनी आज नमो ॲप, तर 14 लाख लोकांनी सरल ॲप डाऊनलोड केले आहे. 97 हजाराहून अधिक बुथ अध्यक्ष आज प्रत्यक्ष मैदानावर काम करत आहेत. भाजप आज सर्वार्थाने बलशाली झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) नेतृत्वात विकसित भारताची संकल्पना सत्यात आणण्यासाठी आज काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांच्या सारखे दिग्गज नेते भाजपमध्ये आले आहेत. काँग्रेसचे (Congress) नेते आणि माजी मुख्यमंत्री असूनही ते भाजपमध्ये येतील असं कधीही वाटलं नव्हतं. आजवर असे अनेक दिग्गज नेते देशहितासाठी भाजपमध्ये येत आहेत. दिवसागणिक रोज पक्षप्रवेश होत आहेत. पक्ष आज कले कलेने वाढत जात असून पक्ष कार्यालयात भाजपचे दुपट्टे कमी पडत आहेत, रोज इतके पक्षप्रवेश आता होत असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) केलाय. आज नागपूरात साजरा होणाऱ्या भाजपच्या 44वा पक्ष स्थापना दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजप देशातील सर्वात बलशाली पक्ष
गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. 6 एप्रिल 1980 ला मुंबईतील अरबी समुद्राच्या साक्षीने अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसचे दुष्ट शासन हद्दपार करण्याचा निश्चय त्यांनी त्यावेळी केला. इंदिरा गांधींनी देशावर लावलेली आणीबाणी, व्यक्ती स्वातंत्र्य, बेरोजगारी, महागाई अशा वाढत्या अनेक समस्यांचे निर्मूलन करून देशात रामराज्य यावे, या उदात्त हेतूने अटलजींनी भाजप पक्षाची स्थापना केली. आज इतक्या 44 वर्षात अनेकांनी भाजप पक्षाला देशातील सर्व शक्तिमान पक्ष म्हणून उभारी दिल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सत्ताही समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण करण्यासाठी आहे, हा अटलजींचा मूलमंत्र लक्षात घेऊन आज भाजपमधील प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहेत. 1980 साली सुरू झालेला हा पक्ष आज जगातील सर्वात मोठ्या पक्षात आपण सर्व काम करत आहोत. महाराष्ट्रात भाजपला सर्वात शक्तिशाली करण्याचं काम खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज राज्यात 122 आमदार आणि 23 खासदार भाजपचे आहेत. तसेच आगामी काळात भाजप नागपूर महानगरपालिकेमध्ये 121 नगरसेवक निवडून आणेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केला.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या - चंद्रशेखर बावनकुळे
आलीकडे जे काँग्रेसचे बुथ अध्यक्ष होते ते आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षात जो बूथ लावतो त्यालाच विश्वासात घेऊन त्याला भाजपमध्ये प्रवेश द्या, असे आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. भाजपला साथ देणे म्हणजे विकसित भारताला साथ देणे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणणे म्हणजे भाजपचा 44 वा स्थापनादिन साजरे करणे होय. जे-जे भाजपविरोधी पक्षात आहे त्यांना पक्षात प्रवेश करणे हाच आपला खऱ्या अर्थानं स्थापना दिन साजरा करणं असेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या