(Source: ECI | ABP NEWS)
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Naxalism in India : चारू मुजुमदार, कानू सन्याल यांनी सुरू केलेल्या उठावाने मोठं रुप धारण केलं आणि नक्षलवाद फोफावला. जल, जंगल, जमीन या आदिवासींच्या सूत्राचे नक्षलवादाने हत्यार केलं.

मुंबई : पुढच्या वर्षी, म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद (Naxalism) संपणार असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी व्यक्त केला आहे. एकेकाळी देशातील आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये प्रभावी असलेला नक्षलवाद आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत जिल्ह्यांमध्येच शिल्लक राहिलाय. नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर भूपतीने शरणागती पत्करली हे मोठं यश. मात्र, हा नक्षलवाद नेमका कसा सुरू झाला? त्याचा प्रसार कसा झाला? नक्षलवाद कोणकोणत्या राज्यांमध्ये प्रभावी होता? तसेच त्यावर उपाययोजना म्हणून सरकारने काय पावले उचलली? या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट
Naxalbari Incident West Bengal: नक्षलवाद चळवळ कशी सुरू झाली?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जमीन सुधारणा धोरण लागू झालं. पण सुरुवातीच्या काळात त्याचे म्हणावे तितके फायदे शेतकऱ्यांना झाले नव्हते. जमीनदारांकडून शेतकरी, शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात शोषण केलं जायचं. त्यामुळे जमिनीच्या मुद्द्यावरून जमीनदार आणि शेतकऱ्यांमध्ये वाद व्हायचे. पश्चिम बंगालमधील नक्षलबारी (Naxalbari) गावात जमीनदारांनी हैदोस मांडला. त्यामुळे शेतकरी, आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता.
शेतकऱ्यांच्या या असंतोषाला चारू मजुमदार, कानू संन्याल, जंगल संताळ सारख्या डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी वाचा फोडली. 'हिंसक शस्त्रांद्वारे भूमीसुधारणा आणि लोकवादी क्रांती' हा मार्ग सुचवून त्याला आंदोलनाला वैचारिक आधार दिला. त्यानंतर मे 1967 मध्ये नक्षलबारीमध्ये सशस्त्र आंदोलन उभं राहिलं आणि त्यामध्ये अनेक जमीनदारांचा जीव गेला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारातही अनेक शेतकरी, आदिवासींचा जीव गेला. ही घटना तिथल्या विद्रोहाला चालना देणारी ठरली.
चारू मुजुमराद यांनी लिहिलेल्या Historic Eight Documents वर हे आंदोलन उभारलं गेलं. त्यानंतर वेगवेगळ्या डाव्या विचारांच्या समूहांनी सशस्त्र संघर्षाचा मार्ग पकडला.
Spread of Naxalism in India : नक्षलवाद कसा पसरला?
सुरुवातीला पश्चिम बंगालमधून सुरू झालेला हा संघर्ष पुढे 1970–1980 च्या दशकांत दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य भारत आणि पूर्व भारतातील जंगली भागांमध्ये पसरला. महाराष्ट्रातील गडचिरोलीचा त्यामध्ये समावेश होतो.
1980 मध्ये ‘People’s War Group’ (PWG) ची स्थापना आणि नंतर विविध गटांचे एकत्रीकरण होऊन CPI (Maoist) या संघटना तयार झाली. त्यामुळे कारवायांचा संघटित आणि व्यापक आघात शक्य झाला. ग्रामीण विकासाकडे होणारे दुर्लक्ष, जमीनविषयक धोरणांचा गोंधळ, आदिवासींचे होणारे शोषण, त्यांची तगमग यातून नक्षलवादाला खतपाणी मिळाले.
Naxal Affected Areas: नक्षलवादाचा प्रभाव कुठेपर्यंत पसरला?
पश्चिम बंगाल (नक्षलबारी) पासून सुरू झालेला नक्षलवाद नंतर झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र (Gadchiroli), मध्यप्रदेश, बिहार आणि काही प्रमाणात केरळपर्यंत पसरला.
सर्वसाधारणतः घनदाट असलेले जंगल, आदिवासी बहुल पातळीवरील जिल्हे आणि प्रशासनाची कमी पोहोच असलेले ग्रामीण भाग, विशेषत: छत्तीसगढ (Sukma, Bijapur, Narayanpur), झारखंड, ओडिशा (Malkangiri, Kalahandi), आंध्र, तेलंगणा (Alluri Sitarama Raju), महाराष्ट्रातील Gadchiroli–Chandrapur परिसर, मध्यप्रदेशचे काही भाग इत्यादी भागात नक्षलवाद पसरला.
शासन आणि सुरक्षा अभ्यासकांच्या वर्गीकरणानुसार वेळोवेळी प्रभावित जिल्ह्यांची संख्या आणि राज्ये बदलत गेली. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या या जंगली पट्ट्याला ‘Red Corridor’ म्हटले गेले.
Govt Steps Against Naxalism: सरकारने काय प्रयत्न केले?
पोलिस कारवाई - केंद्र आणि राज्यांच्या सामायिक अंमलबजावणीने पॅरामिलिटरी आणि राज्य दलांचा वापर करून सशस्त्र मोहीम राबवण्यात आल्या. त्यामध्ये Operation Green Hunt चा समावेश होतो. या माध्यमातून टार्गेटेड अपरेशन्स राबवण्यात आले. Greyhounds सारखे टास्क फ़ोर्स स्थापन करण्यात आले.
स्ट्रॅटेजिक कॉम्बो - काऊंटर-इन्सर्जेन्सी आणि विकासात्मक कामं असा मेळ घातला गेला. फक्त लष्करी उपाय नव्हे, तर पथदर्शी धोरणांतर्गत गावांची विकास योजना, रस्ते, सरकारी योजना पोहोचवणे आणि आत्मसमर्पणाच्या वाटा यानाही प्राधान्य देण्यात आले.
2009 मध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन ग्रीन हंट' मोहिमेद्वारे केंद्र आणि राज्याच्या पोलिसांनी जंगलांमधील नक्षली ठाणी उद्ध्वस्त केली. CRPF, कोब्रा, ग्रेहाउंड्स आणि स्थानिक दलांनी मिळून समन्वय साधला.
त्याच वेळी सरकारने 'Left Wing Extremism Division स्थापन करून नक्षल प्रभावित भागात पायाभूत सुविधा, रस्ते, शाळा, आरोग्य केंद्रे आणि रोजगार योजना राबवल्या.
Forest Rights Act, PESA कायदा आणि शरणागती आणि पुनर्वसन योजना या माध्यमांतून आदिवासी, स्थानिक युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला. अनेक नक्षली कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण करून सरकारी पुनर्वसन योजनांचा लाभ घेतला.
निवडणूक आधारित कार्यक्रम आणि सामाजिक धोरणे, जमीनीचे पुन्हा वाटप, आदिवासी अधिकार कायदे (PESA, Forest Rights Act) योजनांचा समावेश यामुळे दीर्घकालीन पातळीवर नक्षलवादाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न झाला.
Naxalism In Maharashtra: महाराष्ट्रातील नक्षलवाद, प्रवास व महत्त्वाचे टप्पे
महाराष्ट्रात नक्षलवाद्यांची सक्रियता प्रामुख्याने पश्चिम विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडाऱ्याच्या काही भागात होती. गडचिरोली हा भाग नक्षलवाद्यांचा गड समजला जायचा. गडचिरोलीच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष, जमिनींचा वाद, आदिवासींचे प्रश्न आणि दुर्गम भूभागामुळे नक्षलवादी हालचाली तग धरू शकल्या.
अलिकडे मात्र गडचिरोलीतील नक्षलवादाचा प्रभाव जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. नुकतेच नक्षलवाद्यांचा कमांडर भूपती आणि त्याच्या 60 सहकाऱ्यांनी नक्षलवाद सोडून शरणागती पत्करली. हे सर्वात मोठं यश मानलं जातं.
Impact Of Naxalism : नक्षलवादाचा प्रभाव किती उरलाय?
2010 च्या एका आडकेवारीनुसार, देशात 126 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव होता. तो आता कमी आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 11 जिल्ह्यांमध्येच नक्षलवादाचा प्रभाव उरला आहे. त्यामध्येही सर्वाधिक प्रभाव असलेले केवळ तीनच जिल्हे आहेत. येत्या 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी व्यक्त केला आहे.
बंदुकीचा आवाज तर थांबतोय, पण विकासाची पाऊले कशी पडतात यावर सर्व यश अवलंबून आहे. अन्यथा सशस्त्र नक्षलवाद संपला तरी त्याच्या विचाराची वात मात्र तशीच पेटत राहिल हे निश्चित.
ही बातमी वाचा:

























