Chandrapur : कळमनामधील वखारीतील आग धुमसतीच, गाव रिकामं करण्याची तयारी प्रशासनाची तयारी
कळमना इथे 20 एकरावर पसरलेल्या वखारीत काल दुपारी आग लागली. आगीत लाकूड डेपोची अक्षरशः राख झाली असून 40 हजार टन लाकून जळल्याने 50 कोटींहून अधिक रकमेच्या साठ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलच्या कळमना इथल्या लाकूड साठवण डेपोला लागलेली आग अद्याप सुरुच आहे. ही आग विझवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातून 40 च्या जवळपास अग्निशमन गाड्या बोलावण्यात आल्या आहेत. मात्र ही आग अजूनही धुमसत आहे. दरम्यान आग नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनाने गाव रिकामं करण्याची तयारी ठेवली आहे.
कळमनामधील वखारीत काल (22 मे) दुपारी आग लागली होती. या आगीत लाकूड डेपो शेजारचा एचपीसीएल पेट्रोल पंप देखील जळून खाक झाला. 20 एकरावर पसरलेल्या या या डेपोत सुबाभूळ- बांबू- निलगिरीचा साठा होता. हा लाकूड साठवण डेपो बल्लारपूर पेपर मिलच्या मालकीचा आहे. आगीत लाकूड डेपोची अक्षरशः राख झाली असून 40 हजार टन लाकून जळल्याने 50 कोटींहून अधिक रकमेच्या साठ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र पहाटेपासून या चंद्रपूर-गोंडपिंपरी राज्य महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. प्रचंड आग, सोसाट्याचा वारा आणि जलस्त्रोतापासून जास्त असलेले अंतर यामुळे अग्निशमन बंबाना पाणी भरुन आणण्यासाठी वेळ लागत आहे. आज सकाळपासून पुन्हा अग्निशमन कार्याने वेग घेतला आहे.
गाव रिकामं करण्याची तयारी : तहसीलदार
दरम्यान, कळमना इथल्या लाकूड डेपोला लागलेल्या आगीचं भीषण स्वरुप पाहता प्रशासनाने या डेपोच्या 150 मीटर अंतरावर असलेल्या कळमना गावाला अलर्टवर राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु असलं तरी वाऱ्याचा वेग खूप जास्त आहे. त्यामुळे ही आग कळमना गावापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. सोबतच अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर कळमना हे गाव रिकामं करण्यासाठी देखील प्रशासनाने तयारी ठेवली आहे, अशी माहिती बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईनचवार यांनी दिली.
आगीच्या घटनेत दिसली अनोखी माणुसकी
चंद्रपूर जिल्ह्यातील कळमना गावाजवळ झालेल्या लाकूड साठवण डेपोच्या भीषण अग्निकांडात अनोखी माणुसकी दिसून आली. डेपोला लागलेल्या भीषण आगीमुळे चंद्रपूर-गोंडपिंपरी हा मार्ग वाहतुकीसाठी काल संध्याकाळपासून पूर्ण बंद करण्यात आला होता. त्यामुळे चंद्रपूरकडून गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, अहेरी आणि आष्टीकडे जाणारे प्रवासी मध्येच अडकून पडले. यात बस प्रवासी, खाजगी ट्रक आणि इतर वाहनांचा देखील समावेश होता. जवळपास आठ तास हा मार्ग बंद असल्याने स्त्रिया, लहान मुले आणि म्हातारी माणसं तहान-भुकेने व्याकुळ झाली. त्यांची ही अवस्था बघून स्थानिक युवक आणि ग्रामस्थ पुढे सरसावले. स्थानिक युवकांनी काही पैसे गोळा केले आणि ताटकळलेल्या प्रवाशांना पाणी-चहा आणि बिस्किटे अशी खाद्यसामुग्री पुरवली. स्थानिक युवकांच्या या पुढाकाराचे प्रवाशांनी आभार मानले. मात्र ताटकळलेल्या प्रवाशांसाठी मदत पुरवण्यास स्थानिक प्रशासन मात्र पुरते अपयशी ठरले.