Chandrapur : चंद्रपुरात पुन्हा बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यासह 5 कर्मचाऱ्यांना डांबलं
Chandrapur Leopard News : वनविभागाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच नागरिकांनी संतप्त होत वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना डांबले असे नागरिकांचे मत आहे.
Chandrapur News : चंद्रपूर शहरालगत (Chandrapur Leopard News)असलेल्या दुर्गापूर येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत बघायला मिळाली आहे. काल मंगळवारी संध्याकाळच्या दरम्यान वॉर्ड क्र एक मध्ये अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. समोर बिबट्या मुलीला घेऊन जात असलेले पाहताच मुलीला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी मुलीच्या आईने काठीने बिबट्याचा प्रतिकार केला आणि बिबट्याला पळवून लावले. आरक्षा जगजीवन पोप्पलवार असं या मुलीचं नाव आहे.
जखमी अवस्थेतील आरक्षा जगजीवन पोप्पलवार हिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात (Chandrapur Civil Hospital) दाखल करण्यात आले आहे. संतप्त ग्रामस्थांनी या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी आणि पाच अन्य कर्मचाऱ्यांना (forest Dept) एका घरात डांबले. हल्लेखोर वाघ-बिबट यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय या अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. स्थानिक नागरिकांच्या संतप्त भूमिकेमुळे दुर्गापूर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलीस, वनविभागाचे अधिकारी, महसुली अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दुर्गापूर परिसरात या आधी 1 मे रोजी गीता विठ्ठल मेश्राम या 47 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर 30 मार्चला प्रतिक बावणे या 8 वर्षीय मुलाचा तर 17 फेब्रुवारीला राज भडके या 16 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
दुर्गापूर-उर्जानगर भागात वाघ-बिबट्यांचे सातत्याने हल्ले होत असून गेल्या 2 वर्षात वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात किमान 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मात्र यावर वनविभागाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच नागरिकांनी संतप्त होत वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना डांबले असे नागरिकांचे मत आहे. जवळपास पाच तासांनंतर गावकऱ्यांनी डांबून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली.
वनअधिकार्यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे 9 एप्रिलला या भागातून एक बिबट जेरबंद केला होता मात्र त्यानंतरही हा धुमाकूळ सुरूच राहिल्याने संतप्त नागरिकांनी टोकाची भूमिका घेतली.
चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी सांगितलं की, या हल्ल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बिबट्याला ठार करा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर आम्ही बिबट्याला शूट करण्याच्या ऑर्डर काढल्या आहेत. यानंतर आम्ही सर्च सुरु केलं आहे.