Chaitra Purnima 2022 : आई राजा उदो उदो...! तुळजापुरात लाखो भाविकांचा मेळा; चैत्री पौर्णिमेचा सोहळा
Tuljapur TuljaBhawani chaitra purnima : चैत्री पोर्णिमा सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतले.
Tuljapur TuljaBhawani chaitra purnima : आज चैत्री पौर्णिमा आहे. चार दिवसाच्या सलग सुट्ट्यामुळे तुळजापूरात भाविकांनी गर्दी केली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्री पोर्णिमा सोहळा संपन्न होत आहे. दोन वर्षानंतर चैत्री वारीचा खेटा पूर्ण करता आल्याने भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. चैत्री पोर्णिमा सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतले.
चैत्री पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पहाटे भाविकांनी भवानी तीर्थकुंडात स्नान करून थेट मंदिरात जाऊन देवीदर्शन घेऊन पौर्णिमा खेटा पूर्ण केला. पहाटे ऐक वाजता चरणतीर्थ होऊन धर्म दर्शनार्थ आरंभ झाला . सकाळी सहा वाजता घाट होऊन देवीला दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर वस्त्रोलंकार घालण्यात आले. नंतर धुपारती करण्यात येऊन अंगारा काढण्यात आला.
दुपारी एक ते चार दरम्यान देवीला असाह्य उष्णतेपासून सुटका मिळवी म्हणून पंख्याने वारा घालण्याचा विधी पार पडणार आहे. संध्याकाळी सात वाजता देवीला पुनश्च दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर वस्त्रोलंकार घालण्यात येतील. यंदा राज्यातील शेकडो पालख्या वाजतगाजत आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदोउदोचा गजर करीत चैत्र पौर्णिमेसाठी दाखल झाल्या आहेत.
कपाळी मळवट , देवीची माळ , परडी आणि कवड्यांचा माळा घालून हजारो देवीभक्त, आराधी, भाविकांनी देवीदर्शन घेतले. देवीदर्शन होताच भाविकांनी बाजारपेठेत देखील गर्दी केली. देवीचे फोटो, मुर्त्या, मुरमुरे बत्ताशे आदि प्रसाद साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याने बाजारपेठेत दिवसभर भाविकांची मोठी गर्दी बऱ्याच महिन्यानंतर दिसून आली.
उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने बाहेरून येणाऱ्या भाविकांकडून बाटलीबंद पाणी, फळ, उसाचा रस यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. श्रीतुळजाभवानी मंदीराकडे येणाऱ्या विविध रस्त्यांवर तसेच शहरात प्रमुख चौकात, भवानी रोडवर रसवंतीगृहासमोर गर्दी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
PHOTO : जोतिबाच्या नावानं चांगभलं...चैत्र यात्रेत ढोल-ताशाचा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण