Karuna Sharma | करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?
करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
परळी : करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे राहणार शिवाजीनगर यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
माझ्या पतीच्या गावात यायला अडवता का? : करुणा शर्मा
वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा शर्मा पोहोचल्या. मात्र, या ठिकाणी आमच्या साहेबांना बदनाम करायला आलात काय? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा शर्मा यांनी माझ्या पतीच्या गावात यायला अडवता का? असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली. यामुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. यामुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण झाले होते.
करुणा शर्मा लवकरच राजकारणात सक्रिय?
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?
करुणा शर्माची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर ओशिवरा पोलीस स्टेशन याठिकाणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या मधील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण तीन चार महिने शांत झाले.
यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या घटस्फोटा संदर्भात कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुक वरील पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा शर्मा या संपत्तीपासून सामाजिक आणि राजकीय विषयावर ती कायम भाष्य करत होती. यातच दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मी परळीमध्ये येणार आहे. तसेच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असं सांगितल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आज दुपारी दोनच्या दरम्यान करुणा शर्मा या परळी मधील वैद्यनाथ मंदिराच्या समोर दाखल झाल्या.