मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याचे कळताच विविध चौकशा लावून छळण्यात आलं ; एकनाथ खडसेंचा आरोप
मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याचे कळताच विविध चौकशा लावून मला छळण्यात आलं, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.
Eknath Khadse : "मुख्यमंत्री पदाचा आपण दावेदार असल्याचं कळताच आपल्याला बदनाम करण्यात आलं. माझ्यावर विविध आरोप करण्यात आले. शिवाय विविध चौकशा लावून छळण्यात आलं, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. याबरोबरच उत्तर महाराष्ट्रासाठी ही गोष्ट दुर्दैवी असल्याची खंतही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर महाराष्ट्राला आजपर्यंत मुख्यमंत्री पद मिळू शकले नसल्याची खंत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केली होती. या विषयावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, "केवळ आपणच नव्हे तर अनेक पक्षाचे खानदेशातील उमेदवार हे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार राहिले होते. परंतु, त्यांना वेळोवेळी डावलण्यात आले. माझ्या वेळी तर नुसते डावलले नसून आपल्याला विविध प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. माझे फोन टॅप करण्यात आले. मला बदनाम करण्यात आले आणि त्यानंतर तिकीट नाकारण्यात आले. मुख्यमंत्री पदाचा दावेदार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर किती छळ केला गेला असेल त्याचं एकनाथ खडसे हे उदाहरण आहे."
"अनेक पात्र उमेदवारांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ दिले गेले नाही हे दर्दैवी आहे, असे सांगत खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रावर मुख्यमंत्री होण्याबाबत पात्र उमेदवार असतानाही सत्तर वर्षात अन्याय झाला असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतही एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "एसटीचे विलिनीकरण झाले नाही तर अनेक संसार उद्धवस्त होतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे. परंतु, सध्या सरकारने घेतलेले भूमिका योग्य आहे. सरकारने गेल्या काही दिवसांपासून विविध प्रयत्न केले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळू शकला नसल्यामुळे एसटी सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक दुर्दैवी प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. सरकारने प्रयत्न केले असले तरी अजून लालपरी रस्त्यावर येण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. कारण गोरगरीब जनतेसाठी ती महत्वाची सेवा आहे."
"विलिनीकरण करण्याबाबत कर्मचारी मागणी करत असले तरी ते शक्य नाही. सरकारने असे व्यावसाईक उद्योग सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रयत्न केला तर असे इतर 62 उद्योग विलिनीकरणाची मागणी करतील. सरकारने अशा व्यावसायांना मदत केली पाहिजे. शिवाय निधी दिला पाहिजे, यातून मध्यम मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार वाढ आणि घरभाडे वाढ दिली आहे. अजूनही जास्तीची मदत देण्याची भूमिका सरकारने घेतली असल्याने कर्मचाऱ्यांनी विचार करावा आणि कामावर यावे असे आवाहन एकनाथ खडसे यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांची गुडघेदुखी 'बी वेनम थेरपी'मुळे बरी, नेमकी काय आहे ही थेरपी?
Nitin Gadkari : लवकरच वाहनांचा वेग वाढणार! 120 किमी वेगानं वाहन चालवण्यास परवानगी देणार : नितीन गडकरी