(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरे 'वर्षा'वर, तर भुजबळांचं 'रामटेक'वर कमबॅक;नव्या मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह तीन मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे, कुणाला कोणते बंगले दिले आहेत जाणून घेण्यासाठी वाचा...
मुंबई : महाराष्ट्राचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आता नव्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना राहण्यासाठी बंगले देण्यात आले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार अजून झालेला नाही मात्र मुख्यमंत्री आणि सोबत काही मंत्र्यांना नवे बंगले दिले गेले आणि लवकरच ते नव्या घरी निवास करण्यासाठी येतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'वर्षा' बंगला देण्यात आला आहे, तर छगन भुजबळ पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या ''रामटेक" बंगल्यावर परततील. विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' बंगल्यात जयंत पाटील राहणार आहेत आणि पंकजा मुंडे यांच्या 'रॉयल स्टोन' बंगल्यावर आता एकनाथ शिंदे राहणार आहेत.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 28 तारखेला झाला. मुख्यमंत्र्यांसोबतच तीन पक्षांच्या सहा कॅबिनेट मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. कॅबिनेट मंत्रीपदाचा विस्तार अद्याप झालेला नाही मात्र या सहा मंत्र्यांपैकी तीन मंत्र्यांना आता नवे बंगले देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला देण्यात आला आहे. हा बंगला मुख्यमंत्रीपदाचं शासकीय निवासस्थान आहे.
निवडणूक झाली की हा बंगला कुणाला मिळणार ही चर्चा सर्वत्र रंगते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे वर्षावर राहिले नाहीत. वर्षा बंगला हे मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान होण्याची प्रथा वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यापासून सुरू झाली. शरद पवार मुख्यमंत्री झाले असताना ते मात्र वर्षावर राहायला गेले नाहीत. वसंतदादांच्या मंत्रीमंडळात ते उद्योगमंत्री होते आणि उद्योगमंत्री म्हणून त्यांना रामटेक बंगला देण्यात आला होता. रामटेक माझ्यासाठी लकी आहे म्हणत त्यांनी रामटेकवरच राहणं पसंत केलं.
यानंतर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले असताना रामटेकवर राहायला गेले, मात्र त्यांचा रामटेकवरील अनुभव वेगळा ठरला. मुंडे एका नर्तिकेच्या संबंधांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. रामटेकवर असताना त्यांना आणखी बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर छगन भुजबळ या बंगल्यावर राहायला आले आणि सर्वाधिक काळ रामटेकवर राहणारे भुजबळच आहेत, मात्र तेलगी प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, भ्रष्टाचाराचे आरोप आणि तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला होता तेही रामटेकवर असतानाच, तरीदेखील त्यांना यंदाही रामटेक हा त्यांचा आवडता बंगलाच मिळाला आहे.
काहींना लकी वाटणारा तर काहींना शापित वाटणाऱ्या अशा या रामटेक बंगल्यावर आता राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ राहणार आहेत, खरंतर भुजबळ रामटेकवर परतणार आहेत कारण यापूर्वीही मंत्री म्हणून त्यांच्याकडे रामटेक हाच बंगला होता. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे असलेल्या सेवासदन या बंगल्यात राष्ट्रवादी मंत्री जयंत पाटील राहणार आहेत. माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्यावर आता शिवसेनेचे गटनेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे निवास करणार आहेत.