Buldhana News: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना न्यायालयाचा दिलासा; जामीन राहणार कायम
Ravikant Tupkar: बुलढाणा पोलिसांनी तुपकरांच्या जामीन रद्द करण्याची याचिका न्यायालयाने नामंजूर करत रविकांत तुपकरांच्या जामीन कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे रविकांत तुपकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Buldhana News बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज जिल्हा न्यायालयात पार पडली आहे. बुलढाणा पोलिसांनी (Buldhana Police तुपकरांच्या जामीन रद्द करण्याची याचिका न्यायालयाने नामंजूर करत रविकांत तुपकरांच्या जामीन कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे रविकांत तुपकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे तुपकरांच्या समर्थक आणि शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत फटाक्याची आतिषबाजी आणि पेढे वाटून हा जल्लोष साजरा केला. रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी वकील म्हणून तुपकरांची बाजू मांडली होती. अखेर आज तुपकरांच्या बाजूने निर्णय लागल्याने आता आपण पुन्हा नव्या दमाने लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला आहे.
रविकांत तुपकरांचा जामीन कायम
शेतकऱ्यांसाठी झालेल्या विविध आंदोलनात रविकांत तुपकर यांच्यावर दाखल 23 गुन्ह्यात न्यायालयाने त्याना जमीन मंजूर केला होता. मात्र जमीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पुन्हा बुलढाणा पोलिसांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत, जामीन रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी नंतर सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली होती. आंदोलन करणे हा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. कुठलेही क्रिमिनल गुन्हे रविकांत तुपकर यांच्यावर नाहीत. सोबतच मेधा पाटकर यांच्या आंदोलनाचा हवाला देत ॲड. शर्वरी तुपकर यांनी सरकारी वकिलांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढले होते. अखेर आज जिल्हा न्यायालयाने रविकांत तुपकरांच्या बाजूने निर्णय देत त्यांचा जामीन कायम ठेवला आहे.
धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही
माझ्या सारख्या सामान्य शेतकाऱ्यांच्या मुलाला तुरुंगात टाकण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मला अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला. मात्र आज सत्याच्या विजय झाला आहे. सत्तेपुढे कुणाचेही चालत नाही, हे आजच्या निर्णयातून सिद्ध झाले आहे. ज्यांनी ज्यांनी मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, ते आता वरच्या न्यायालयात देखील जातील. मात्र त्यांच्या राजकीय गढया आणि वतनदाऱ्या इथला शेतकरी, कष्टकरी उधवस्थ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आज पासून आम्ही नव्या दमाने, नव्या उमेदीने लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलो आहोत. जनता ही सत्याच्या बाजूने आहे. त्यामुळे आजच्या निकालाप्रमाणे निवडणुकीत देखील सत्याचा विजय होईल, असा विश्वास देखील रविकांत तुपकर यांनी बोलतांना व्यक्त केला. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.