Breaking News LIVE : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा बारामती दौरा, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट देणार
Breaking News LIVE Updates, 06 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सहा जिल्ह्यात होत असलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता मतदारांना आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 63 टक्के मतदान
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 63 टक्के मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या 144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी आज मतदान झाले. सर्व ठिकाणी उद्या (ता.6) सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: धुळे- 60, नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65. एकूण सरासरी- 63.
भारतीय रेल्वेत प्रथमच चारचाकी गाड्यांची वाहतूक करण्यासाठी सुधारित वैशिष्ट्यांसह प्रोटोटाइप डबा
भारतीय रेल्वेत प्रथमच, मध्य रेल्वेनं चारचाकी गाड्यांची वाहतूक करण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूनं उघडता येणारे आणि इतर सुधारित वैशिष्ट्यांसह एक प्रोटोटाइप डबा विकसित केला आहे. गेल्या वर्षी, आरडीएसओ आणि ऑटोमोबाईल उत्पादकांच्या सहकार्यानं वापरातून काढून टाकलेल्या आणि वापरात नसलेल्या प्रवासी डब्ब्यांपासून मध्य रेल्वेने 110 किमी प्रति तास वेग क्षमता आणि 18 टनाच्या जास्त भार क्षमता असलेला हा डबा आहे. साइड एंट्रीसह 18 टनाचा अधिकचा भार वाहून नेण्याची क्षमता असलेले हे सर्वत्र उपयोगी होणारे डब्बे केवळ विविध प्रकारच्या गाड्यांसाठीच नव्हे तर पार्सल वाहतूकीसाठी देखील वापरले जाऊ शकतात. आरडीएसओ, लखनौ यांच्या संयुक्त विद्यमाने हे डबे मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपद्वारे केवळ 30 दिवसांच्या विक्रमी वेळेत विकसित करण्यात आले आहेत. काल (मंगळवार) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या प्रोटोटाइप कोचचे निरीक्षण केले. मध्य रेल्वेवर ऑटोमोबाईल वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्ष 2019-20 मध्ये 118 डबे लोड केले गेले होते, जे 2020-21 मध्ये वाढून 287 डबे झाले. या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत मध्य रेल्वेने 200 गाड्या वाहून नेणारे डबे लोड केले जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या (86 डबे) तुलनेत 133% अधिक आहेत. त्यामुळे हा नवीन प्रोटोटाईप डब्याचा खूप फायदा मध्य रेल्वेला होईल अशी माहिती अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत अज्ञातांचा बस स्थानाकात धूडगूस
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी याठिकाणी अज्ञातांनी बस स्थानाकात जाऊन धूडगूस घातलाय. यामध्ये सात ते आठ बसच्या काचा फोडल्या असून परिसरातील दुचाकीची देखील अज्ञातांनी तोडफोड केलीय. इतकचं नाहीतर इचलकरंजी आगारातील चार कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केलीय. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचा संबंध दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताशी असण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. त्यामध्ये जखमी असलेल्या नागरिकाचा काल उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्या अपघाताला इचलकरंजी आगारातील एसटी बस जबाबदार ठरवत ही तोडफोड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इचलकरंजीच्या शहापूर पोलीस ठाण्यात तोडफोड करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गचे मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे दीर्घ आजारानं निधन
सिंधुदुर्ग : मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे कॅन्सरच्या आजाराने दुःखद निधन झाले. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे जिल्हाअध्यक्ष राजन शंकर दाभोलकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मूळचे वेंगुर्ला तालुक्यातील दाभोळे गावचे रहिवासी असून सध्या कणकवली तेली आळी येथे स्थायिक झाले होते. महाराष्ट्र निवनिर्माण पक्षाच्या स्थापनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे त्यांनी सांभाळली होती. जिल्ह्यात मनसे पक्ष वाढीसाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसोबत त्याचे सलोख्याचे संबंध होते. जिल्हयातील विविध प्रश्नबाबत ते मनसेच्या माध्यमातुन आवाज उठवत. सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून प्रशसनाच्या भोंगळ कारभारा विरुद्ध अधिकाऱ्यांना जाब विचारत हसत मुख व मनमिळावू स्वभामूळे त्यांचा मित्र परिवार ही मोठा होता. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वेंगुर्ले येथील दाभोळे गावात अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या दुःखद निधनाने मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दुःख व्यक्त केले.
परभणीच्या मानवत शहरात निर्बंध लागू, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनाचा निर्णय
परभणी : परभणीच्या मानवत शहरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शाळा, धार्मिक स्थळे, आठवडी बाजार खेळांची मैदाने, गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला. 5 ते 16 ऑक्टोबर पर्यंत मानवतमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा बारामती दौरा, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट देणार
भाजप नेते किरीट सोमय्या हे आज सातारा बारामती असे दौऱ्यावर असून ते जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट देणार आहेत. काही वेळात ते जरंडेश्वर साखर कारखान्यावरती पोहोचतील. त्यानंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकारांशी बोलणार आहेत. त्यानंतर फलटण मार्गे बारामतीला रवाना होणार आहेत. किरीट सोमय्या हे जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर येत असल्यामुळे पोलिसांनी मोठा फौजफाटा हा कोरेगाव परिसरात लावलेला आहे. जरंडेश्वर कारखान्याच्या निलाव प्रक्रियेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोटाळा केल्याचा त्यांचा आरोप आहे.
दहिसर ते डी एन नगर या मेट्रो दोन ए च्या कामाचा पहिला फेज पूर्ण
मुंबई : दहिसर ते डी एन नगर या मेट्रो दोन ए च्या कामाचा पहिला फेस आज पहाटे पूर्ण झाला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्हि. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते आज पहाटे या मेट्रोचा शेवटचा आय गर्डर ओशीवरा येथे लावण्यात आला. साडेआठ किमीचा हा मेट्रो मार्ग असून सतरा स्थानक यात आहे.या आय गर्डर बसविण्याच्या कामामुळे आता या मार्गाचे दुसऱ्या फेस चा कामाला सुरुवात होणार असून अतिशय वेगाने होण्यास मदत होणार आहे.