Breaking News LIVE: ज्येष्ठ गायक व संगीतकार मिलिंद इंगळे यांचे वडील पंडित माधव इंगळे यांचे निधन
Breaking News LIVE Updates, 21 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
PM Modi To Address Nation: पंतप्रधान मोदींचा आज देशवासियांशी संवाद, मोठ्या घोषणेची शक्यता
PM Modi To Address Nation Today: काल देशानं कोरोना लसीकरणात एक महत्वाचा टप्पा पार केला. देशानं 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि देशवासियांचे आभार मानले. आज या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कोरोना लसीकरणासह मोदींच्या संबोधनात काश्मीरमधील घडामोडींवर देखील भाष्य होण्याची शक्यता आहे. काल देशातील लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला. यानंतर बोलताना मोदींनी म्हटलं होतं की, ही भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानले होते. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं.
China Corona Update : चीनमध्ये कोरोना रिटर्न्स! जगातील सर्वाधिक लसीकरण होऊनही पुन्हा लॉकडाऊनची वेळ
देशाने आता कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचे सुरक्षा कवच प्राप्त केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "सबका प्रयास ही जी गोष्ट आहे ही सामूहिक इच्छाशक्तीच्या आधारे साध्य करता येते. आजचे यश हे देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, शास्त्रज्ञ, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, लस वाहतूक करणारे कर्मचारी तसेच 130 कोटी देशवासियांच्या सामूहिक इच्छाशक्तीचा परिणाम आहे. या नंतरच्या काळातही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने उपचार मिळावा याकडे आपले लक्ष असेल."
Maharashtra Unlock : आजपासून नाट्यगृहे (Theatre) आणि चित्रपटगृह (Cinema Hall) सुरु होणार आहेत. दरम्यान आजपासूनच अम्युझमेंट पार्कही (Amusement Park) खुली करण्यात येणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने काल शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपासून म्हणजेच, 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळुन खुली करण्यास परवानगी देण्यात येईल. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केले होते. यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करणयाचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. टास्कफोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत चर्चा केली होती.
नवले उड्डाणपूल परिसरात टॅंकर पलटी, चौघांचा मृत्यू तर 12 गंभीर जखमी
पुण्यातून जाणाऱ्या पुणे- बंगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ एका केमिकल टॅकरचा भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यु झालाय. कालच या ठिकाणी एका ट्रकने धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला होता. महामार्गाच्या सदोष रचनेमुळे हा भाग मृत्युचा सापळा बनलाय.
ज्येष्ठ गायक व संगीतकार मिलिंद इंगळे यांचे वडील पंडित माधव इंगळे यांचे निधन
ज्येष्ठ गायक व संगीतकार मिलिंद इंगळे यांचे वडील पंडित माधव इंगळे यांचे आज दु 12 वाजून 27 मिनिटांनी वयाच्या 88 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्याच्या मागे त्याचे चिरंजीव गायक संगीतकार मिलिंद इंगळे, नातू संगीतकार सुरेल इंगळे व सून मानसी इंगळे ज्या इव्हेंट्स ऑर्गनायजर आहे हे आहेत.
गोव्यातील राजकीय स्थितीसंदर्भात अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची चर्चा
गोव्यातल्या राजकीय स्थिती संदर्भात दिल्लीत खलबतं सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्वाची बैठक सुरु असून त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही उपस्थिती आहे. गोव्यात भाजपच्या रणनीती संदर्भात, संभाव्य युतींबद्दल चर्चेची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1,632 नव्या रुग्णांची नोंद, 40 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1 हजार 632 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 40 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 1 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 97.46 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 65 लाख 99 हजार 850 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
पिंपरखेड बँक दरोडाप्रकरणी पोलिसांकडून 10 पथकं तयार
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बॅक दरोड्याच्या प्रकरणात तपास सुरु. बॅकानीही या प्रकरणात सुरक्षेत लक्ष घालण्याची गरज. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पोलिसांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली आहे आणि तिथे देखील या आरोपींचा शोध सुरू आहे असं पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं. पुणे ग्रामीण पोलिसाकडून 10 पथक तयार करण्यात आली आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी काही सीसीटीव्ही मध्ये दिसली आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील तपास केला जातोय..