China Corona Update : चीनमध्ये कोरोना रिटर्न्स! जगातील सर्वाधिक लसीकरण होऊनही पुन्हा लॉकडाऊनची वेळ
China Corona Update : जगात सर्वाधिक लसीकरण झालेल्या चीनमध्ये पुन्हा कोरोनानं आपलं डोकं वर काढल्यानं तिथं अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे
China Corona Update : काल भारतात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन केलं गेलं. मात्र इतकं लसीकरण झाल्यानंतर आपल्यावरील कोरोनाचा धोका कमी झालाय असं आपण मानत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण जगात सर्वाधिक लसीकरण झालेल्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाची लाट आली आहे. जगाला कोरोनाची भेट देणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. विशेष म्हणजे जगात सर्वाधिक लसीकरण झालेल्या चीनमध्ये पुन्हा कोरोनानं आपलं डोकं वर काढल्यानं तिथं अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चिनी सरकारनं यामुळं पुन्हा नियम कडक केले आहेत. अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक भागांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या असून काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
चीनच्या उत्तर आणि उत्तर पश्चिम भागांमध्ये असलेल्या शहरांमध्ये कोरोनाचं संक्रमण वेगानं पसरत आहे. बाहेरुन आलेल्या प्रवाशांमुळं हे प्रमाण वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं प्रशासनानं कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळं मास टेस्टिंग केली जात आहे. सोबतच टूरिस्ट स्पॉट बंद करण्यात आले आहेत. चीनच्या Lanzhou क्षेत्रामध्ये लोकांना घराच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. आवश्यक काम असेल तर घराबाहेर पडा असं सांगण्यात आलं आहे. आवश्यक कामासाठी बाहेर पडत असाल तर कोविड निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्यास सांगितलं जात आहे. नियमांचं पालन न केल्यास कारवाई देखील केली जात आहे.
जगात सर्वाधिक लसीकरण चीनमध्ये
जगात सर्वाधिक लसीकरण चीनमध्ये झालं आहे. चीनमध्ये 75 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. जवळपास 223 कोटी लोकांचं लसीकरण चीनमध्ये झालं आहे. त्यानंतर भारतात 30 टक्क्यांच्या जवळपास लसीकरण झालं आहे. काल भारतानं 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार केला. भारतानंतर अमेरिका, रशिया, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनीमध्ये सर्वाधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.