Breaking News LIVE : 150 एन.एस.जी कमांडोंची लसीकरण करण्याच्या निमित्ताने बीकेसी लसीकरण केंद्राला भेट
LIVE
Background
मनसुख हिरण यांच्या कुटुंबियांची एटीएसकडून चौकशी; बँक व्यवहार देखील तपासणार
प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज एटीएसने ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. मुख्य म्हणजे मनसुख हिरण यांच्या बँक अकाउंट्सचे डिटेल्स त्यांनी मिळवले. आणि थेट कुटुंबियांना चौकशीला बोलवले. त्यामुळे एटीएस लवकरच तपासाची दिशा ठरविण्यात यशस्वी होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एटीएसकडे तपास गेल्यानंतर आता चार दिवस उलटले आहेत. मनसुख हिरण यांच्या केसचा कागदी अभ्यास केल्यानंतर आता एटीएसची टीम फिल्डवर जाऊन तपास करत आहे. त्यातूनच आज एटीएसच्या टीमने ठाण्यातील अनेक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. यातून त्यांनी महत्वाची कागदपत्रे आणि महत्वाची माहिती संकलित केली.
रेल्वेत नोकरीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा, IRCTCच्या कर्मचाऱ्याला अटक, अंबरनाथमधील प्रकार
रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कैलास राजपाल सिंग अस या भामट्याचं नाव आहे . बदलापूरला राहणारा कुमार चव्हाण हा नोकरीच्या शोधात असताना त्याला कैलास राजपाल सिंग या भामट्याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. कैलास आयआरसीटीसीच्या चर्चगेट स्टेशनवरील कँटीनमध्ये काम करत होता. खोटी परीक्षा, खोटी मुलाखत घेऊन पास होण्यासाठी 5 लाख रुपये त्याने कुमार चव्हाण याच्याकडून उकळले.
PET EXAM : मुंबई विद्यापीठाच्या पेट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, याच महिन्यात होणार परीक्षा
मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार 25 मार्च रोजी एम. फील. तर 26 आणि 27 मार्च 2021 रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा होणार आहे. एकूण 79 विषयांसाठी ही परीक्षा ॲानलाईन पद्धतीने होणार असून याबाबतचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. पेट परीक्षेच्या नियोजनाचा भाग म्हणून दिनांक 12 ते 17 मार्च दरम्यान विद्यार्थ्यांना मॉक ( सराव) परीक्षा देता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना लघुसंदेश आणि ईमेलवर माहिती पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले आहे.
150 एन.एस.जी कमांडोंची लसीकरण करण्याच्या निमित्ताने बीकेसी लसीकरण केंद्राला भेट
आज सुमारे 150 एन.एस.जी कमांडोंनी लसीकरण करण्याच्या निमित्ताने बीकेसी लसीकरण केंद्राला भेट दिली. हा बूस्टर डोस एकदम सहजतेने दिला गेला आणि संपूर्ण सैन्याने बीकेसी लसीकरण टिमचे कौतुक केले. या क्रांतिकारक लसीकरण मोहिमेदरम्यान बीकेसी टीम देशाची सेवा करत असल्याचा आनंदच आहे : डॉ. राजेश डेरे, अधिष्ठाता, बीकेसी जम्बो कोविड रुग्णालय.
लातूर जिल्ह्यात एकाच दिवसात 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे खळबळ
दिवसेंदिवस लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्याभरात 144 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज लातूर जिल्ह्यात 1047 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 86 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 146 अहवाल प्रलंबित आहेत. 1223 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 60 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26250 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 853 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 715 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24682 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 41 आहे.
राज्यात आज दिवसभरात 14 हजार 317 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 14 हजार 317 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, मागील 24 तासात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, आज दिवसभरात 7 हजार 193 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 21 लाख 06 हजार 400 रुग्ण बरे होऊन घरी परतले, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 92.94 टक्के, सध्या राज्यात 1 लाख 06 हजार 070 अॅक्टिव्ह रुग्ण
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व उद्याने बंद राहणार, पालिकेचा निर्णय
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व उद्याने बंद राहणार आहेत. शहरात काही दिवसांपूर्वी कोरोनाचे दिवसाला शंभरच्या आत रुग्ण आढळत होते. आता मात्र हाच आकडा सहाशे पार झालाय. म्हणून हा निर्णय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतलाय. 31 मार्चपर्यंत हा निर्णय लागू असेल, पुढील परिस्थिती पाहून उद्याने खुले करण्याचा निर्णय होईल.
कोरोना नियम पायदळी तुडवत जंगी विवाह सोहळा आयोजित केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने लागू केलेले निर्बंध पायदळी तुडवत जंगी विवाह सोहळा आयोजित केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण पूर्वेत आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्याच्या आयोजनाबाबत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने आधीच निर्बंध लागू केले आहेत. मात्र, त्या नियम आणि निर्बंधांना काही जणांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे आढळून आले आहे. कल्याण पूर्वेत काल संध्याकाळी अशाच प्रकारचा जंगी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्याठिकाणी 700च्या आसपास लोकांची उपस्थिती होती. पालिकेच्या पथकाला याबाबत माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत या विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर कलम 188, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 तसेच कोविड-19 उपाययोजना नियम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.