Breaking News LIVE | राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचं नुकसान
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 29 एप्रिल ते 20 मे 2021 दरम्यान दहावी बोर्डाची परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर 23 एप्रिल ते 21 मे 2021 दरम्यान बारावीची परीक्षा होणार असल्याचं या संभाव्य वेळापत्रकात बोर्डाने जाहीर केलं आहे. बोर्डाने या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिक्षम मंडळाच्या ठरलेल्या कालावधी परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे सरकारच्या परवानगीनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाने एप्रिल आणि मे महिन्यात दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा आयोजित केली आहे.
राज्यात लॉकडाऊन नाही, पण नियमांची कडक अंमलबजावणी होणार : आरोग्यमंत्री
काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना बाधितांचा आकडा काहीसा वाढतोय. राज्यात लॉकडाऊन होणार नाही, मात्र नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच स्थानिक प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले असून त्यांच्या स्तरावर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्या त्यांनी कराव्यात, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, असंही ते म्हणाले.
राठोडांचा राजीनामा घेणार नाहीत कारण..., नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार नाहीत कारण त्यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या प्रकरणावर एका मंत्र्याला राजीनामा घ्यावा लागेल अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते. त्यावेळी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला.
दक्षिण आफ्रिकेने सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीचे 10 लाख डोस परत घेण्यास सांगितलं
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पाठवण्यात आलेल्या कोरोना लसीचे दहा लाख डोस दक्षिण आफ्रिकेला परत करायचे आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे. याआधी आम्ही कोरोना लसीकरण अभियानात अॅस्ट्राजेनेकाच्या लसीचा वापर करणार नाही, असं दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलं होतं. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ओळख कोरोना लसीचा पुरवठा करणारी प्रमुख कंपनी म्हणून निर्माण झाली आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाच्या लसीची उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. मागील आठवड्यातच दक्षिण आफ्रिकेत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसीचे दहा लाख डोसची पहिली बॅच पोहोचली होती. तर पाच लाख डोसची पुढची बॅच पुढील काही आठवड्यातच तिथे पोहोचणार होती.