(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : यंदाही दहीहंडी साजरी होणार नाही, दहीहंडी पथकामध्ये नाराजी
Breaking News LIVE Updates, 24 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
'...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानाखाली लगावली असती'; नारायण राणेंची जीभ घसरली
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
केंद्र सरकारनं ओबीसींच्या सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची माहिती राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावी, यासाठी राज्य सरकारनं 31 जुलैला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ दिल्लीला रवाना झाले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काल (सोमवारी) दिवसभरात छगन भुजबळ यांनी काही वरिष्ठ नेत्यांच्या देखील भेटीगाठी घेतल्या. मागील सुनावणीत केंद्र सरकारला इम्पिरीकल डेटा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इंपिरिकल डेटा उपलब्ध नसल्यानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाद्वारे गदा आली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि नागरी विकास खात्यांनी ओबीसींचा इंपीरिकल डाटा 2011 ते 2014 या काळात जमा केला. दरम्यान, 11 मे 2010 रोजी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन यांच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं के. कृष्णमूर्ती निकाल दिला. या निकालामध्ये घटनेची 243 डी (6) व 243 टी (6) ही कलमे वैध ठरविली. म्हणजेच इतर मागास प्रवर्गाचे ग्रामीण आणि नागरी पंचायत राज संस्थामधील आरक्षण वैध ठरविले. मात्र, हे देताना त्रिसूत्रीची अट घातली. रिट पीटिशन नंबर 980/2019चा 4 मार्च 2021 रोजी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने याचा उल्लेख केला होता.
गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संपन्न, गेल्यावर्षीची नियमावली कायम
गेल्यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावटं होतं. त्यामुळे गेल्यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा यासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. यामध्ये गतवर्षीच्या नियमवाली कायम राहील असं ठरलं आहे. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट, तर घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी. तसेच गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळांनी घ्यावी, अशा अटी असणार आहेत.
चुकीच्या नोंदी दुरुस्त करून द्या अन्यथा विष पिऊन उडी मारेन, शेतकऱ्याची आत्महत्येची धमकी
पंढरपूर तालुक्यातील देगाव इथल्या गट नंबर 341/1, 341/2 अ, 341/2 ब या सातबारा उताऱ्यावरील सर्कल, तलाठी, कोतवाल यांनी बेकायदेशीर नोंदी चुकीच्या पद्धतीने घेतले असून सातबारा उतारा दुरुस्त करून मिळावा एक शेतकरी हातात विषाची बॉटल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढला आहे. कुबेर चिमाजी घाडगे असे या शेतकऱ्याचे नाव असून सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून बसला आहेत. दोन वाजेपर्यंत नोंदी न केल्यास बाटली मधील विष पिऊन उडी मारेन असा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत. शेतकऱ्याला समजावून सांगण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यंदाही दहीहंडी साजरी होणार नाही, दहीहंडी पथकामध्ये नाराजी
राज्यात कोरोना संसर्ग असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाही दहीहंडी सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दहीहंडी पथकांमध्ये नाराजी आहे. जोगेश्वरी येथे जय जवान दहीहंडी मंडळाने याचा निषेध करत दहीहंडीचे सात थर लावले. या निषेधार्थ आंदोलनात मनसेचे अविनाश जाधव हे सुद्दा सहभागी झाले.
महाड, नाशिकनंतर आता पुण्यात नारायण राणेंवर तिसरा गुन्हा दाखल
महाड, नाशिक नंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त गुन्हे दाखल करावेत यासाठीचे आदेश शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत. नारायण राणे हे आता चिपळूनमध्ये असून त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटला, राणेंच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर
महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात नारायण राणेच्या विरोधात आंदोलन होणार असून राणेंच्या घराबाहेर मोठ्या संख्येनं युवासैनिकांनी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईच्या प्रत्येक वॅार्डमध्ये आंदोलनाची तयारी सुरु असून ठिकठिकाणी राणेंच्या विरोधात होर्डिंग लावण्यात आले आहेत.
नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य, अटक करण्यासाठी नाशिक पोलीस रवाना
केंद्रीय मंत्री नारायण राणेनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीसांनी दिले आहेत. राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं एक पथक रवाना झालं आहे. राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापल्याचं दिसत आहे.