Breaking News LIVE : मुंबईत उद्या नियोजित इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द
Breaking News LIVE Updates, 11 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु; शाळा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना काय आहेत?
कोरोनाची राज्यातील स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचं लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. टास्क फोर्सने जे संगितलं आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत.
कोरोना मुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तर शहरी भागांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व इतर शहरी भागात कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत संबंधित महापालिका आयुक्त यांना अधिकार असणार आहे.
सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन व अन्य जिल्ह्यांत देखील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतील. महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी खास समिती गठित केली जाईल. समिती शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेईल. यामध्ये महापालिका आयुक्त हे अध्यक्ष असतील नगरपंचायत, नगरपालिका ग्रामपंचायत, स्तरावर सुद्धा समिती गठीत केली जाणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील.
शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्या; WHO च्या मुख्य शास्ज्ञज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचं आवाहन
जगभरातल्या देशांनी शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केलं आहे. कोरोना काळामुळे गेल्या वर्षीच्या मार्चपासून जगभरातील शाळा बंद आहेत. यामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं.
शाळा बंद राहिल्याने मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असून यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर,अंतर्गत गर्दी टाळणे, हाताची स्वच्छता ठेवणे आणि शिक्षकांचे लसीकरण या गोष्टींसह शाळा सुरु करण्यासाठी प्राथमिकता द्यायला हवी असं आवाहन डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटरवरुन केलं आहे. भारतात गेल्या मार्चपासून शाळा बंद आहेत. पण काही राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात काल 5,609 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 137 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 5,609 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 हजार 676 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8टक्के आहे.
राज्यात काल 137 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 30 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 66 हजार 123 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (4), धुळे (0) , हिंगोली (78), नांदेड (52), अमरावती (76), अकोला (34), वाशिम (18), बुलढाणा (60), यवतमाळ (10), वर्धा (11), भंडारा (1), गोंदिया (2), चंद्रपूर (73), गडचिरोली (26) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 892 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मालेगाव, धुळ्यात, नंदूरबार, परभणी, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक 782 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 99,05, 096 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,63, 442 (12.75 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,13,437 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत उद्या नियोजित इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द
मुंबईत उद्या नियोजित इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. बीएमसी शिक्षण विभागानंतर आता शिक्षण उपसंचालककडून मुंबईतील सर्व शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या संपूर्ण राज्यात इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा जरी होत असली तरी मुंबईतील शाळांमध्ये ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सुरवातीला काल करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेने शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता मुंबईतील सर्व शाळांमध्ये उद्या होणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून परिपत्रकद्वारे काळविण्यात आले आहे
ठाकरे सरकार दारुड्याचे सरकार आहे, पुन्हा एकदा सिद्ध झालं; आचार्य तुषार भोसले यांची प्रतिक्रिया
ठाकरे सरकार दारुड्याचे सरकार आहे, पुन्हा एकदा सिद्ध झालं. मंदिरा विषयीचा आकस दिसून आला.देव धर्म यावर उपजीविका करणाऱ्याच्या उपासमारीची चिंता नाही हे पुन्हा स्पष्ट झाले. या सरकारला गुडघे टेकवण्यास भाग पाडू, आचार्य तुषार भोसले यांची प्रतिक्रिया.
शिक्षण शुल्कात 15 टक्के कपातीचा निर्णय आजही नाही
शिक्षण शुल्कात 15 टक्के कपातीचा निर्णय आजही नाही. मंत्रीमंडळ बैठकीत आज चर्चा झाली मात्र ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. या निर्णयाला अनेक मंत्र्यांचा विरोध असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे तूर्तास तरी शिक्षण शुल्कात 15 टक्के कपातीचा निर्णयाचा दिलासा पालकांना मिळण्याची शक्यता धूसर आहे.
तिसरी लाट : राज्याला ज्या क्षणी दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज त्याक्षणी लॉकडाऊन लागू होईल - राजेश टोपे
मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील कोविड लॉकडाऊन निर्बंध शिथील करण्याची घोषणा करत असतानाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज असल्याचा दावा केला. तिसरी लाट आल्यावर राज्याला ज्या क्षणी दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, त्याक्षणी राज्यात लॉकडाऊन लागू होईल, अशा स्पष्ट इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.
नरेगा घोटाळा प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली
बीड जिल्ह्यातील नरेगा घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची तातडीने बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने राधाबिनोद शर्मा यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.