मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण
माळाकोळी (ता.लोहा) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अभिजीत ढोके हे सहायक व्यवस्थापक पदावर होते.
नांदेड : अपघातात गंभीर जखमी एका बँक अधिकाऱ्याचे ब्रेनडेड झाले होते. पतीच्या शरीराचा त्यांच्या पश्चात कोणासाठी तरी उपयोग व्हावा, याच हेतुने त्यांच्या पत्नीने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी (ता.3) नांदेड (Nanded) शहरातील ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळपर्यंत ग्रीन कॅरीडोर करण्यात आले. सबंधित युवकाचे यकृत, ह्रदय विमानाने तर, दोन किडनी छत्रपती संभाजीनगर येथे रस्ते मार्गाने पाठवण्यात आले. याशिवाय दोन डोळे हे नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला दान करण्यात आले. बँक अधिकारी अभिजित अशोक ढोके (वय 37) यांच्या अवयवदानामुळे (organ donate) चार जणांना जीवनदान व एकास दृष्टी मिळाली आहे. नांदेडमधील हे सहाव्यांदा ग्रीन कॉरिडोर असून ते यशस्वी झाले आहे.
माळाकोळी (ता.लोहा) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अभिजीत ढोके हे सहायक व्यवस्थापक पदावर होते. 29 जून रोजी अभिजीत ढोके आणि बँकेतील इतर कर्मचारी कारने माळाकोळी येथील हिराबोरी ते लांडगेवाडी मार्गावरून जात होते. यावेळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात मध्यवर्ती बँकेत कॅशियर पदावर कार्यरत असणारे सुनील बगाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अभिजीत ढोके आणि शादुल शेख हे गंभीररित्या जखमी झाले होते. इतर एक जण किरकोळ जखमी होता. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अभिजीत ढोके यांच्यावर चार दिवसांपासून यशोसाई हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर मंगळवारी त्यांना आयटीआय परिसरातील ग्लोबल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. दरम्यान, त्यांचे ब्रेनडेड झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. या घटनेनंतर अभिजीत ढोके यांच्या पत्नी प्रिया ढोके यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयास कुटुंबीयांतील इतर सदस्यांनी सहमती दिली. त्यानंतर बुधवारी दुपारी 12 ते 3 वाजे दरम्यान ग्रीन कॅरीडोर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथून पहाटे डॉक्टांच्या दोन टिम नांदेडमध्ये दाखल झाल्या. चार तासात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर, यकृत, ह्रदय हे छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे विमानाने पाठवण्यात आले. तर डोळे नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. एक किडनी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम व दुसरी किडनी मेडिकव्हर हॉस्पीटल येथे रुग्णास दान करण्यात आली. विशेष म्हणजे ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ या तीन किलो मिटरचा अंतर अवघ्या पाच मिनिटात कापण्यात आले.अभिजीत यांच्यामुळे चौघांना जीवदान मिळालं असून एकास दृष्टी मिळाली आहे. मरावे परी किर्तीरुपी उरावे... ही म्हणत अभिजीत यांच्या कुटुंबीयांनी खरी करुन दाखवली.
हेही वाचा
लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे जमवणे जीवावर बेतले; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू