ब्रेन हॅमरेज ते लेखक, महिनाभर कोमात असून आयुष्याशी झुंजणाऱ्या भिडे यांची प्रेरणादायी गाथा
ब्रेन हॅमरेज झाल्यामुळं आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर आयुष्यात अनेक अडचणी आल्या. पण खचून न जाता आयुष्यातील प्रत्येक अडचणींना तोंड देत उभा राहिलेले समीर भिडे यांनी त्यांच्या अनुभवावर आता एक पुस्तर लिहलंय.
मुंबई: आपल्या आयुष्यात कधी कोणतं वळणं येईल आणि कशा पद्धतीने येईल याबाबत कोणीच सांगू शकत नाही. मात्र अचानक एक दिवस आलेलं हे वळणं तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. असंच काहीसं घडलंय सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या समीर भिडे यांच्यासोबत. भिडे यांच्या आयुष्यात आलेल्या त्या एका दिवसाने त्यांचं संपूर्ण दैनंदिन आयुष्यचं पालटलं आणि त्यांच्या याच अनुभवावर भिडे यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलंय.
समीर भिडे (51) यांना 2017 साली दुर्मिळ प्रकारचा ब्रेन हॅमेरज झाला. या ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलं. मात्र अशा परिस्थितीत देखील खचून न जाता आपल्या अनुभवामुळे इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं प्रकाशन डिसेंबर 8 ला होणार आहे.
पुण्यात जन्मलेले समीर भिडे 1990 साली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यानंतर तिकडेच स्थायिक झाले. सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. मात्र अचानक 31 जानेवारी 2017 मध्ये त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर समीर भिडेंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर भिडे जवळपास 1 महिना कोमामध्ये होते. सेरेबेलम व्हॅस्क्युलर अबनॉर्मेलिटीमुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झालं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे फार दुर्मिळ आणि गंभीर मानलं जातं. या आजारपणामुळे त्यांच्या व्यावसायिक आणि वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या. या घटनेवर आधारित भिडेंनी ‘वन फाईन डे’ या नावानं पुस्तक लिहलंय.
त्या एका दिवसाच्या घटनेनंतर आपल्या आयुष्यात कशा पद्धतीनं बदल झाला याचं वर्णन त्यांनी या पुस्तकात केलं आहे. त्याचसोबत भिडे यांनी त्यांच्या या आजारपणावर घेतलेल्या वैद्यकीय उपचारांबदद्ल देखील नमूद केलं आहे.
भिडे यांनी म्हटलं आहे की, “ब्रेन हॅमेरजच्या काळात मला ज्या प्रकारचे अनुभल आले होते त्यावरुन हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे. सर्वांच्या आयुष्यात असे प्रसंग येऊ शकतात. मात्र त्या प्रसंगांना आपण खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे. या पुस्तकाद्वारे मी माझा अनुभव लोकांसोबत शेअर करत असून अनेकांना यामधून प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.”
समीर भिडे पुढे म्हणतात की, “मी अमेरिकेत एका मोठ्या पदावर कार्यरत होतो. शिवाय माझं वैवाहिक आयुष्य देखील उत्तम सुरु होतं. मात्र ब्रेन हॅमरेजनंतर हे सर्व काही बदलून गेलं. कोमातून बाहेर आल्यानंतर मी काही काळ अंथरूणावर होतो. अशातच वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला आणि माझा घटस्फोट झाला. सर्व काही सुरळीत सुरु असताना त्या एका दिवसामुळे आयुष्याचं चित्र बेरंग झालं. मात्र तरीही मी माझ्या जीवनाशी कृतज्ञ आहे.”
या आजारावर भिडे यांनी प्रदीर्घकाळ उपचार घेतले आहेत. समीर भिडे यांच्यात दृष्टी, उच्चार, शारीरिक हालचाल यामध्ये थेरेपीद्वारे सुधारणा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अॅलोपॅथी औषधोपचार देखील केले. याच जोडीला मेडिटेशन, योगा यासाठी ते भारतातही आले होते. अॅक्युपंक्चर, एनर्जी हिलींग, रागा थेरेपी या नॅचरोपॅथी आणि होलीस्टीक उपचारांवरही त्यांनी भर दिला.
समीर भिडे यांच्यावर अजूनही उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होतेय. भिडे पुढे म्हणाले, “आजारपणाच्या या काळात मला अनेक वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती भेटल्या. तसंच माझे मित्र आणि ऑफिसमधील काही सहकाऱ्यांनी या काळात मला फार मदत केली. इतक्या गंभीर आजारातून माझे प्राण वाचले हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.”