गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन
राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप झाल्यानंतर आता त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजप आक्रमक झालं असून त्याविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलं आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला. त्यावर आता विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केलं आहे.
पुण्यात भाजपच्या वतीनं अलका टॉकीज चौकात गृहमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार खंडणीखोर असून गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्व येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलन करत निषेध नोंदवला. या आंदोलनात ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे सरकार खंडणीखोर सरकार असून तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सचिन वाझेच्या माध्यमातून हे सरकार खंडणी गोळा करत असल्याचं उघड झालंय. अजून किती वाझे या सरकारकडे आहेत याचा तपास केला पाहिजे, सरकारला थोडी जरी शरम असेल तर त्यांनी सत्ता सोडावी अशी मागणी त्यांनी केली.
नागपूर
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आंदोलन संविधान चौकात सुरू असताना अचानक भारतीय जनता युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते सिव्हिल लाइन्स परिसरातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. सोबतच रस्त्यावर बसून धरणे आंदोलनही केलं.
गृहमंत्र्यांवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आहे ती भाजपकडून केली जात आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत अचानक सर्व सुरक्षा व्यवस्था फोल ठरवत थेट गृहमंत्र्यांच्या घराच्या दारासमोर हा आंदोलन केलेला आहे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आणि आता सर्वाना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले आहे
अंबरनाथ
ठाकरे सरकार विरोधात भाजपचे अंबरनाथच्या शिवाजी चौकात जोरदार निदर्शन करण्यात आली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या फोटोला नोटांचा हार घालण्यात आला आणि महिलांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.
नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात हातात निषेधाचे फलक घेत आज सकाळी भाजपने आंदोलन करत ठाकरे सरकार भ्रष्ट आहे अशी घोषणाबाजी केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष, युवा आघाडी आणि महिला कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज बीड शहरातील भाजपा कार्यालयासमोर निदर्शने केले..या वेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे हप्ते वसुली करणारे सरकार आहे अशा आशयाचे फलक यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात घेतले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली
अकोला शहरातील गांधी चौकात भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केलीये. भाजप आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार आणि जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केलंय.
चंद्रपूर
चंद्रपूरातील भाजप कार्यकर्ते अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झाले आहेत. जटपुरा गेट परिसरात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले. 100 कोटी खंडणी मागणाऱ्या अनिल देशमुखांना बरखास्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. जनता कोरोना काळात दहशतीत असताना सत्ताधाऱ्यांची कोटी कोटी उड्डाणे घेत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
जालना जिल्ह्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात निषेध आंदोलन.
जालना येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. शहरातील सावरकर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी गृहमंत्री खंडणीखोर असल्याचा आरोपाचे फलक दाखवून हा निषेध केला. अनिल देशमुख यांनी राममंदिर निधीला खंडणी संबोधले होते मात्र खरी खंडणी तेच जमा करत असून त्यांच्यामुळे पदाला काळिमा फासला जात असल्याने त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केलीय. यावेळी आंदोलकांनी आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली.
पालघर
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी पालघर मधील हुतात्मा चौकात आंदोलन केलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची भाजपा कार्यकर्त्यांनी मागणी केली. यावेळी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
संबंधित बातम्या :