(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : केंद्राने वाझे प्रकरणाची सखोल चौकशी करावी, फटाक्यांची माळ लागेल : राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी गृहमंत्री अनिल देशमुखांना हटवण्याची मागणी केली. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी गृहमंत्री अनिल देशमुखांना हटवण्याची मागणी केली. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते, हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशा फटाक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील, असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनीही एक पत्रक काढत आपली बाजू मांडली असून आरोप सिद्ध करावेत अन्यथा परमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे.
यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले की, मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? याची उत्तरं अजून का नाही मिळाली? पोलिसांनी बॉम्ब ठेवले ही साधी गोष्ट नाही, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, मुळात परमबीर सिंग ह्यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली? असा सवाल देखील त्यांनी केला. राज ठाकरे म्हणाले की, जर गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना 100 कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे, त्यामुळं सरकारनं तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत.ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी कारण ह्या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल ह्याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल. आणि आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ, असं ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी, असं ते म्हणाले.