भाजपचं आज वाढीव वीज बिलांविरोधात राज्यव्यापी आंदोलन, वीज बिलांची होळी करणार
वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होत भाजप राज्य सरकारला शॉक देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी भाजप वीज बिल होळी आंदोलन करणार आहे.
मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीज बिलांवरून राजकारण चांगलंचा तापल्याचं दिसत आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अशातच भाजपकडून आज राज्यभरात वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज भाजप वीज बिलांची होळी करणार आहे.
वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होत भाजप राज्य सरकारला शॉक देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी भाजप वीज बिल होळी आंदोलन करणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असं म्हटलंय. pic.twitter.com/Hi4jwkEpib
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 19, 2020
भाजपच्या वीज बिल होळी आंदोलनासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, 'कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असं म्हटलंय.' पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी भाजपाने वीजबिल होळी आंदोलन पुकारलं आहे. जनतेने यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो.'
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार सहभागी होणार आहे. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप
वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा वाद आता रंगताना दिसत आहे. वीज बिलं कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतर हे सरकार शब्दावरून फिरलं, हे विश्वासघातकी सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केलीय. तर भाजपच्या काळात वीज बिलांची प्रचंड थकबाकी झाल्याचा पलटवार ऊर्जा मंत्ती नितीन राऊत यांनी केला आहे. भाजपची सत्ता राज्यात असताना 5 वर्षात महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
वाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा राज्यात उग्र आंदोलन करु : मनसे
वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसेही आक्रमक झाली असून उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं ठाकरे सरकारला देण्यात आला आहे. वाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा राज्यात उग्र आंदोलन करु, असं अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. "वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल असं सरकारनेच जाहीर केलं होतं. परंतु दिलासा देण्यास सरकारने नकार दिला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा," असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अशातच मनसेच्या वतीनं 26 नोव्हेंबरला वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
'वीज कापायला आले तर मनसैनिक तुमच्यासोबत'; वीज बिलं न भरण्याबाबत मनसेचं आवाहन
"महाराष्ट्रातील जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करत आहोत. वीज मंडळाचे लोक वीज कापण्यासाठी आले तर मनसैनिक तुमच्यासोबत असतील. यावेळी काही अनुचित घडलं तर याची जबाबदारी सरकारची असेल. सर्वसामान्यांची वीज कापणार असाल तर तुमचं वीज कनेक्शनही कापल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहा अन्यथा आपापल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे काढा," असं बाळा नांदगावकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :