सदाभाऊंची मनधरणी करण्यात भाजपला यश, पदवीधर निवडणुकीतून माघार घेत रयतचा पाठिंबा
नाराज सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आलं असून पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेने माघार घेत, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला आहे.
सांगली : नाराज असलेल्या सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात अखेर भाजपला यश आले आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेने माघार घेत, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. सांगलीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उमेदवार उभा करुन भाजपासमोर आव्हान उभं केलं होतं. त्याचबरोबर राजू शेट्टी यांना साद घालत खोत यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सोमवारी (16 नोव्हेंबर) सांगलीमध्ये बैठक पार पडली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयामध्ये रयत क्रांती संघटनेच्या पाच जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये ही बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये विरोधी महाविकास आघाडीला फायदा होऊ नये, या दृष्टीने भाजपाला मदत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यासोबत यापुढील काळात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी देत पुणे पदवीधर निवडणुकीतून उमेदवारी मागे घेण्याची मागणी केली. त्यानुसार रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि सदाभाऊ खोत यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी माघार घेतली जाईल, अशी भूमिका बैठकीत जाहीर केली. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी रयत क्रांती संघटना भाजपचा एक घटक पक्ष आहे आणि या नात्याने सत्तेत असताना रयत क्रांती संघटनेचा नेहमीच सन्मान राखला गेलेला आहे, असं सांगितलं.
पदवीधरमधून माघार, भाजपाला पाठिंबा एका घरात नवरा-बायकोच्या तक्रारी असतात आणि इथे दोन वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या. कार्यकर्त्यांच्या अन्यायाच्या अनेक तक्रारी होत्य आणि त्याची समाधान करण्यात आले आहे. तसेच संघटना म्हणून त्यांना लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवता आली नाही, त्यामुळे पदवीधर निवडणूक लढवावी अशी रयतच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुका या तीन महिने आधी होत आहेत आणि त्यांची इच्छा आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत.आता या परस्थितीमध्ये भाजप उमेदवार माघार घेणे शक्य नाही. अशा स्थितीमध्ये आपण भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यानुसार मंगळवारी रयत क्रांती संघटना आपला उमेदवार माघारी घेईल, असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे.
विरोधकांकडून खालच्या पातळीचे राजकारण तसेच या निवडणुकीत विरोधकांनी भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाचा संग्राम देशमुख असा एक उमेदवार पुणे पदवीधर निवडणुकीत उभा केला आहे. हे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण सुरु असल्याची टीका पाटील यांनी केली.
सदाभाऊ यांना मानाचे स्थान भाजपमध्ये सदाभाऊ खोत यांना मानाचे स्थान आहे. यापुढील काळात पक्षात आणि सत्तेमध्येही रयत आणि सदाभाऊ यांना सन्मान देण्यात येईल, आणि देवेंद्र फडणवीस यांचे सदाभाऊ खोत यांच्यावर विशेष प्रेम आहे, असं मतही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
संबंधित बातम्या
समिती नेमून सदाभाऊ खोत यांना हाकलून लावलंय, परत घेण्याचा प्रश्नच नाही : राजू शेट्टी