समिती नेमून सदाभाऊ खोत यांना हाकलून लावलंय, परत घेण्याचा प्रश्नच नाही : राजू शेट्टी
राजकारणात कोणच कोणाचा शत्रू नसतो. शेतकऱ्याच्या प्रश्नांवर आम्ही दोघेही एकाच विचारधारेतील आहोत असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे आणि राजू शेट्टी यांचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत.समिती नेमून सदाभाऊ खोत यांना हाकलून लावलंय, त्यामुळे पक्षात पुन्हा घेण्याचा प्रश्नच नाही : राजू शेट्टी
कोल्हापूर : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे आणि राजू शेट्टी यांचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत. यावर ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत, त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही, अशी तिखट प्रतिक्रिया स्वाभीमानी शेतकरी संघटना प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली आहे.
ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत, त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही. आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा हा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आणखी काहीतरी पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न आहे. समिती नेमून सदाभाऊ खोत यांना हाकलून लावलं आहे. कडकनाथमध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांचे पैसे द्या, पुतना मावशीचे प्रेम नको, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
शेट्टी आता काय दररोज गोमूत्राने अंघोळ करतात का? : खोत
राजू शेट्टीच्या टीकेला सदाभाऊ खोतांचे प्रत्युत्तर, राजू शेट्टींनी 25 वर्ष माझ्या हातात हात घालून काम केले. माझे हात स्वच्छ नव्हते तर 25 वर्षे सोबत काम करताना कसं चालत होते. मी चारित्र्यहीन माणूस आहे, तर शेट्टी आता काय दररोज गोमूत्राने अंघोळ करत आहात काय? राजू शेट्टी यांना निर्वाशासारखं राज्यपालांच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती संघटनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नावाची गरज आम्हाला नाही.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेले म्हणून फक्त त्यांच्यात आणि माझ्यात दरी निर्माण झाली. जर शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास रस्त्यावर उतरले तर निश्चितपणाने राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेन," असं सदाभाऊ खोत म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत सदाभाऊ खोत बोलत होते. लुटारुंच्या विरोधात आम्ही दोघे लढलो पण जर आज राजू शेट्टींनी लुटारुंची संगत सोडली तर निश्चितपणाने त्यांना परत खांद्यावर घ्यायला सदाभाऊ खोत तयार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
"जी मागणी आम्ही केली तिच मागणी त्यांनी उचलून धरली. राजू शेट्टी आणि माझ्यात शेताच्या बांधावरुन भांडण नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या, ऊसाच्या प्रश्नांवर माझे आणि राजू शेट्टींचे एकमत होत असेल तर एकत्रितपणे साखर सम्राटांच्या विरोधात उभे राहू शकतो," असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
दोघे परत येणार का या प्रश्नावर सदाभाऊ खोत म्हणाले की, "राजकारणात कोणच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. काही मुद्द्यावर आम्ही बाजूला झालो होतो. या अर्थ आमच्या विचारात मतभिन्नता नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नांवर आम्ही दोघेही एकाच विचारधारेतील आहोत."
सदाभाऊ खोत भाजपवर नाराज भाजपवर नाराज असलेले सदाभाऊ खोत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज महत्वाची बैठक होणार आहे. सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेली रयत क्रांती संघटना या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुकीत वेगळी चूल मांडताना दिसत आहे. भाजपमध्ये आता निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. रयत क्रांतीच्या कार्यकर्त्याना संधी मिळत नाही. तसंच पक्षाकडून गृहीत धरले जात असल्याने सदाभाऊ खोत भाजपवर नाराज आहेत.