कुठे जोडे मारो, कुठे प्रतिमेचं दहन; राज्यभरात राष्ट्रवादीचं गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. त्यांनी राज्याचे नेतृत्त्व केलं पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आज राज्यभरात राष्ट्रवादीने आंदोलन केलं.
मुंबई : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा राज्यभरात तीव्र विरोध केला जात आहे. गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याच राष्ट्रवादी काँग्रेसने कालच जाहीर केलं होतं. त्यानुसार आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे.
"शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे," अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका अतिशय चुकीची असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर
राज्यभरात कुठे कुठे गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन?
पुणे - 'माफी मागा, अन्यथा कुठेही फिरु देणार नाही' पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंडई परिसरात जोरदार निदर्शने केली. गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. त्यांच्या फोटोला चपलांचा हार घालत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपचंद पडळकर यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. राष्ट्रवादीच्या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतु तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पार पाडलं. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना कुठेही फिरु देणार नाही, अशा इशारा देण्यात आला.
बारामती - गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात निवेदन दिलं. यानंतर पोलिसांनीही गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
कोपरगाव (शिर्डी) - कारवाईच्या मागणीसाठी तहसीलदारांकडे निवेदन गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा कोपरगावमध्येही निषेध करण्यात आला. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पडळकरांच्या फोटोला जोडे मार आंदोलन करत निषेध करण्यात आला. तसंच पडळकरांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचं निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आलं.
मनमाड-येवला - पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन मनमाडमध्येही गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. शहर राष्ट्रवादीतर्फे गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध केला. तसंच येवला शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या फोटो जाळत निषेध केला.
वसई - घोषणा देत पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवरुन गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आज वसईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. वसईच्या नवघर बस आगारात गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत पुतळ्याचे दहन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
सिंधुदुर्ग - 'लोकनेत्यावर टीका करण्याची पात्रता गोपीचंद पडळकर यांची नाही' सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार गोपीचंद पडवळ यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो करत त्याचं दहन केलं. शरद पवार हे लोकनेते आहेत. त्यांची ख्याती ही देशभर आहे. अशा लोकनेत्यावर टीका करण्याची पात्रता गोपीचंद पडळकर यांची नाही. आज जिल्ह्यात ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आलं.
कोल्हापूर - 'तोंड आवारा, नाहीतर कोल्हापुरी पायतानाचा हिसका दाखवू' राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापुरातही गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन केलं. शिवाजी चौकात आंदोलन आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केला. "तोंड आवारा, नाहीतर कोल्हापुरी पायतानाचा हिसका दाखवू", "एका विकृत आमदाराने टीका करणे योग्य नाही", "जाहीर माफी मागावी अन्यथा कोल्हापुरी पायतानाचा हिसका दाखवू", अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.
हिंगोली - रिसोड ते हिंगोली मार्गावर टायर जाळून रास्तारोको गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हिंगोलीच्या रिसोड ते हिंगोली या मुख्य राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मध्यभागी टायर जाळून पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळाने या मार्गावरील सर्व वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळ हा रास्ता रोको करण्यात आला. हिंगोलीपासून काही अंतरावर असलेल्या केसापूर फाटा येथे हा रास्ता रोको केला होता.
वाशिम - पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारुन दहन वाशिम जिल्ह्यात काल (24 जून) संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारुन पडळकर यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. वाशिमच्या अकोला नाका इथे हे आंदोलन करण्यात आलं होतं.
चंद्रपूर - 'गोपीचंद पडळकरांना धडा शिकवा' चंद्रपुरात शरद पवार विचार मंचतर्फे बुधवारी निदर्शने करत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. पडळकर यांनी शरद पवार यांना कोरोना संबोधलं होतं. चंद्रपूरच्या स्थानिक गांधी चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने-नारेबाजी केली. अभद्र भाषा बोलणाऱ्या पडळकर यांना धडा शिकवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. शरद पवार महाराष्ट्राचे -देशाचे नेते असल्याची भावना व्यक्त करत त्यांचा अपमान सहन करुन घेतला जाणार नसल्याची तंबीही दिली.