Sudhir Mungantiwar : खंजीर-खंजीर करता, देव करो तुम्हाला बोधचिन्ह खंजीरच मिळो - मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar : बाळासाहेबांचे फोटो हे विचारांसाठी सर्वजण लावतात. फक्त त्यांच्या मुलानेच फोटो लावावा, हा जर हट्ट असेल तर मग उद्या शिवसैनिकांना पण त्यांचा फोटो लावता येणार नाही.
Sudhir Mungantiwar on Uddhav thackeray : एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील सत्तातंतर झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेच्या (Shiv sena) 40 आमदारांसह बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर उद्धव ठाकरे (Sudhir Mungantiwar) आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीकेचा बाण सोडला. ज्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असं वक्तव्य शिवसेनेकडून करण्यात येत आहे. यावर आता भाजपकडून उत्तर दिले जाऊ लागलेय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. येता जाता खंजीर-खंजीर करता... देव करो तुम्हाला पुढचं बोधचिन्ह खंजिरच मिळो, असा खोचक टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय.
बाळासाहेबांचे फोटो हे विचारांसाठी सर्वजण लावतात. फक्त त्यांच्या मुलानेच फोटो लावावा, हा जर हट्ट असेल तर मग उद्या शिवसैनिकांना पण त्यांचा फोटो लावता येणार नाही. कारण बाळासाहेब काही त्यांचे वडील नाही. तुमची जर ही भूमिका असेल तर मग तुम्ही मोदींचे फोटो का लावले, तुमचं काही नातं होतं का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. जो कोणी हातात भगवा घेतो तो बाळासाहेबांचा फोटो लावतो, यात दुःख व्यक्त करण्यापेक्षा आनंद व्यक्त केला पाहिजे, असेही ते म्हणाले. ईडीचा दबाव असता तर छगन भुजबळ, संजय राऊत, राज ठाकरे, अनिल परब भाजप मध्ये आले असते, मला असं वाटतं की खोतकर साहेब हे शिंदे साहेबांसोबत शिवसेना मजबूत करण्यासाठी जात असतील. जर शरद पवार हे पितामह भीष्म असतील तर अर्जुन हा पांडवांच्या बाजू जाणारच, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
महाराष्ट्र तोडणार ही रेकॉर्ड खूप जुनी झाली आहे. हे सर्व सहानुभूती घेण्यासाठी आहे. मुंबई तोडण्याचे महापाप तर काँग्रेसचे आहे, तुम्ही अजुनही काँग्रेसच्या मांडीवर आहात. महाविकास आघाडीतून बाहेर निघालेले नाहीत, लोकं आता यांच्या डायलॉगबाजीला कंटाळलेले आहेत. मुंबईमध्ये एकदा यांचा पराभव केल्याशिवाय यांची शब्द रचना बदलणार नाही, अशी खरमरीत टीका मुनगंटीवार यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या सामनाच्या मुलाखतीबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले की, ही पारिवारिक मुलाखत होती. सहज-सुलभ प्रश्न विचारत ही कौटुंबिक मुलाखत घेतली. ही एका वैफल्यग्रस्त माजी मुख्यमंत्र्याची जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी केलेला असफल प्रयत्न होता.